राजनाथ सिंह यांची चीनवर टीका; आयएनएस विशाखापट्टणम विनाशिका नौदलात सामील
मुंबई : काही बेजबाबदार राष्ट्रे संकुचित पक्षपाती हितसंबंध आणि वर्चस्ववादी प्रवृत्तींमुळे संयुक्त राष्ट्रांच्या सागरी कायद्यांची (यूएनसीएलओएस) चुकीची व्याख्या मांडत आहेत, अशा शब्दात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी चीनवर टीका केली. विनाशिका आयएनएस विशाखापट्टणम सिंह यांच्या उपस्थितीत नौदलाच्या ताफ्यात सामील झाली, त्या वेळी ते बोलत होते. भविष्यात आपण केवळ आपलीच नाही, तर जगाची मागणी पूर्ण करण्यासाठी जहाज बांधणी करू, त्यामुळे केवळ मेक इन इंडिया नाही, तर मेक फॉर वल्र्डचे आपण स्वप्न साकार करणार आहोत, असा विश्वास सिंह यांनी या वेळी व्यक्त केला.
भारत जबाबदार सागरी भागीदार आहे. सहमतीवर आधारित तत्त्वांच्या आधारे शांततापूर्ण व नियमांवर आधारित स्थिर सागरी सुव्यवस्थेला भारताचे समर्थन आहे. सध्या ४१ पैकी ३९ जहाजांची भारतातील विविध केंद्रांवर निर्मिती केली जात असल्याचे या वेळी सिंह यांनी सांगितले.
आयएनएस विशाखापट्टणम जहाज स्वावलंबनाचे उत्तम उदाहरण असल्याचे या वेळी नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग म्हणाले. पी १५ ब्रावो श्रेणीतील पहिली स्वदेशी बनावटीची युद्धनौका आयएनएस विशाखापट्टणम रविवारी भारतीय नौदलात दाखल झाली. जहाजावरून ब्रह्मोस आणि बराकसारख्या क्षेपणास्त्राने सज्ज अशा या नौकेमुळे नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे. विनाशिका नौका आयएनएस विशाखापट्टणमचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत जलावतरण करण्यात आले. माझगाव डॉक शिपबिल्डर लि. मध्ये या जहाजाची निर्मिती करण्यात आली आहे.
‘आयएनएस विशाखापट्टणम’बाबत..
१६४ मीटर लांब आणि ७४०० टन वजन असलेली ही भव्य आणि शक्तिशाली युद्धनौका नौदलाच्या पी १५ ब्राव्हो या प्रकल्पाचा भाग आहे. संपूर्ण भारतीय बनावटीची ही युद्धनौका आहे. शत्रूच्या जैविक, रासायनिक, आण्विक हल्ल्याला तोंड देण्याची तिची क्षमता आहे. ७६ मिमी तोफ व एके ६३० तोफ यामुळे विशाखापट्टणमची मारक क्षमता अधिक घातक होते. शत्रूच्या रडारला चकवा देणाऱ्या या अत्याधुनिक युद्धनौकेची क्षमता आठ हजार सागरी मैल प्रवास करण्याची आहे.
The post बेजबाबदार राष्ट्रांकडून सागरी कायद्यांचा चुकीचा अर्थ! appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3r5MZsK
via
No comments:
Post a Comment