‘लोकसत्ता चतुरंग चर्चा’मधून तज्ज्ञांचे मार्गदर्शन
मुंबई : मूल दत्तक घेण्याचा केवळ निर्णय पक्का करण्यासाठीही बहुतांश जोडप्यांना बराच वेळ लागतो. हा निर्णय घेतला जातो, तेव्हा दत्तकविधान प्रक्रियेचे ओझे त्यांच्या मनावर असते. नवीन ‘ऑनलाइन’ प्रक्रियेतून हे दत्तकविधान व्हायला खूप वेळ लागेल का, दत्तकविधानात कोणत्या कायदेशीर अडचणी येऊ शकतात, दत्तक दिल्या जाणाऱ्या बाळाशी आपले ऋणानुबंध जुळतील का, नातेवाईक, समाज त्यांना स्वीकारेल का, अशा चिंता त्यांना भेडसावतात. याच प्रश्नांची तज्ज्ञांच्या माध्यमातून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न ‘लोकसत्ता चतुरंग चर्चा- दत्तक पालकत्व’ या ऑनलाइन कार्यक्रमात येत्या गुरुवारी केला जाणार आहे.
‘इंडियन असोसिएशन फॉर प्रमोशन ऑफ अॅडॉप्शन अॅण्ड चाइल्ड वेलफेअर’ (आयएपीए) संस्थेत दत्तकविधान प्रमुख म्हणून काम करणाऱ्या, तसेच दत्तक पालकत्वाविषयी, त्यातील कायदेशीर गोष्टींवर समुपदेशन करणाऱ्या सविता नागपूरकर आणि दत्तक पालकांचा ‘पूर्णांक’ हा मदत गट चालवणाऱ्या, दत्तक मुलांचे तसेच त्यांच्या पालकांचे समुपदेशन करत सामाजिक क्षेत्रात दीर्घकाळ कामाचा अनुभव असलेल्या संगीता बनगिनवार या चर्चेत सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. मूल दत्तक घेतलेले पालकही या चर्चेत सहभागी होणार असून इच्छुक पालकांच्या प्रश्नांना उत्तरेही या कार्यक्रमात दिली जाणार आहेत.
‘सेंट्रल अॅडॉप्शन रीसोर्स ऑथॉरिटी’ अर्थात ‘कारा’ हा विभाग केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत काम करत असून मूल दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक पालकांना नियमानुसार ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे असते. दत्तक प्रक्रियेत गेल्या काही वर्षांमध्ये झालेले बदल, कायदेशीर बाबी आणि त्यात येणाऱ्या अडचणींबद्दल पालकांच्या मनात विविध शंका असतात. त्यांचे निरसन या चर्चेतून होऊ शकेल. तसेच या विषयाशी जोडलेले सामाजिक व भावनिक प्रश्नही चर्चिले जातील.
सहभागी होण्यासाठी…
येत्या २५ नोव्हेंबर रोजी (गुरुवारी) सायंकाळी ६ ते ७ या वेळेत ऑनलाइन माध्यमातून ही चर्चा होईल. वाचक https://ift.tt/3qQsLTY या लिंकवर नोंदणी करून चर्चेत सहभागी होऊ शकतील.
थोडी माहिती…
‘सेंट्रल अॅडॉप्शन रीसोर्स ऑथॉरिटी’ अर्थात ‘कारा’च्या आकडेवारीनुसार करोनाचा काळ असूनही २०२०-२१ मध्ये देशांतर्गत ३,१४२ दत्तकविधाने झाली, तर परदेशांमध्ये ४१७ मुले दत्तक गेली.
The post दत्तक पालकत्त्वाच्या पैलूंची चिकित्सा appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3cCdmy0
via
No comments:
Post a Comment