नरिमन पॉइंट ते कफ परेड उन्नत मार्ग, पूर्वमुक्त मार्गाचा विस्तार, द्रुतगती मार्गाचे काँक्रीटीकरण
मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात वाढती वाहनसंख्या आणि आंतरशहरे रहदारीत झालेली वाढ यांमुळे सातत्याने भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मंगळवारी झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नरिमन पॉइंट ते कफ परेडदरम्यान दीड किमीचा उन्नत मार्ग उभारण्यासोबतच पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गाचे पूर्ण काँक्रीटीकरण करण्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्याबरोबरच मुंबई आणि ठाणे या शहरांतील प्रवास जलद व्हावा, याकरिता पूर्वमुक्त मार्गाचा ठाण्यापर्यंत विस्तार करण्याचे निर्देशही या बैठकीत देण्यात आले.
मुंबई महानगर क्षेत्र विस्तारत असताना इतर शहरांकडून मुंबईकडे होणाऱ्या रस्ते रहदारीतही मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, त्या तुलनेत रस्ते अपुरे वा अरुंद असल्याकारणाने येथे होणारी वाहतूक कोंडी नित्यनेमाची आहे. या कोंडीमुळे वाहनचालक आणि सर्वसामान्य प्रवासी वर्ग यांच्यात निर्माण झालेली नाराजी लक्षात घेऊन एमएमआरडीएने या रस्त्यांच्या अद्ययावतीकरण तसेच विस्ताराला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण करून खड्डेमुक्त करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मंगळवारच्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. याखेरीज दक्षिण मुंबई आणि पूर्व उपनगरे यांना जोडणाऱ्या पूर्वमुक्त मार्गाचा ठाण्यापर्यंत विस्तार करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. या दोन्ही निर्णयांमुळे मुंबई ते ठाणे तसेच बोरिवली, वसई, भाईंदर या शहरांदरम्यानची वाहतूक गतीमान होण्याची शक्यता आहे. द्रुतगती मार्गाच्या काँक्रीटीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने आता या कामासाठी निविदा मागविण्यात येणार आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण करून मार्च २०२२ मध्ये कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानंतर दोन वर्षांत काम पूर्ण करण्यात येणार आहे.
दक्षिण मुंबई आणि पूर्व उपनगरे थेट जोडण्यासाठी १६.८ कि.मी.चा लांबीचा पूर्वमुक्त मार्ग बांधण्यात आला आहे. पी. डिमेलो मार्ग ते चेंबूर दरम्यानच्या पूर्व मुक्त मार्गामुळे २०१३ पासून प्रवास वेगवान झाला आहे. पी. डिमेलो मार्गावरून वेगात चेंबूरला आल्यानंतर पुढे ठाण्याला जाण्यासाठी वाहनचालक, प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेता छेडानगर ते ठाणे असा पूर्वमुक्त मार्गाचा विस्तार करण्याचा विचार पुढे आला. प्राधिकरणाच्या मंगळवारच्या बैठकीत यावर चर्चा झाली, तर विस्तारीकरणाची व्यवहार्यता तपासण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. छेडानगर ते मुलुंड असा पूर्वमुक्त मार्ग पुढे नेता येऊ शकतो का, याचा व्यवहार्यता अभ्यास करण्यात येणार आहे. हा प्रकल्प व्यवहार्य ठरल्यास पूर्वमुक्त मार्ग मुलुंडवरून पुढे पूर्व द्रुतगती मार्गावरून प्रस्तावित आनंदनगर, साकेत, खारगाव उन्नत रस्त्याशी जोडला जाणार आहे. या दृष्टीने प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येईल.
दक्षिण मुंबईत उन्नत मार्ग
कफ परेड, चर्चगेट, नेव्ही नगर आणि कुलाबा या परिसरात नेहमी वाहतूक कोंडी होते. ही बाब लक्षात घेता २००८-०९ मध्ये नरिमन पॉइंट ते कफ परेड सागरी मार्गाचा प्रस्ताव पुढे तयार करण्यात आला होता. मात्र, नरिमन पॉईंटच्या पुनर्विकासाच्या हालचाली सुरू झाल्याने हा प्रकल्प मागे पडला. आता एमएमआरडीएने पुन्हा हा प्रकल्पाला चालना दिली आहे. १.६ किमी लांबीच्या आणि चार मार्गिकेच्या या प्रकल्पाचा अभ्यास पूर्ण झाला आहे. याअनुषंगाने आता प्रकल्पाचा बृहत आराखडा तयार करण्यासाठीचा प्रस्ताव प्राधिकरणासमोर ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला आणि व्यवहार्यता अभ्यासाला मंगळवारी प्राधिकरणाने हिरवा कंदील दाखविला. त्यामुळे आता लवकरच बृहत आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.
खड्डेमुक्त प्रवासाचे भविष्यचित्र
पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील सर्व मार्गिका डांबरी आहेत. असे रस्ते लवकर पावसाळय़ात खराब होतात. त्यावर मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडतात. त्यामुळे या दोन्ही मार्गाचे काँक्रीटीकरण करण्याच्या प्रस्तावास एमएमआरडीएच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. एमएमआरडीएच्या प्रस्तावानुसार २४ किमी लांबीच्या पश्चिम द्रुतगती मार्गावरील अंधेरी ते दहिसरदरम्यान सर्व मार्गिकेचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. तर वांद्रे ते अंधेरी भाग यातून वगळण्यात आला आहे. पश्चिम द्रुतगती मार्गाच्या काँक्रीटीकरणाच्या कामासाठी ७५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, तर पूर्व द्रुतगती मार्गावरील शीव ते मुलुंडपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या मार्गावरील केवळ दोन मार्गिकांचे काँक्रीटीकरण केले जाणार असल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे.
The post मुंबई-ठाण्याच्या कोंडीवर उतारा appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3kHXTkr
via
No comments:
Post a Comment