मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मत
मुंबई : कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
कृषी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचे वातावरण होते. आंदोलने सुरू होती आणि आजही सुरूच आहेत. आपल्या सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्यांचे यात नाहक बळी गेले आहेत. पण या अन्नदात्याने आपली शक्ती दाखवून दिली, त्यांना माझे त्रिवार वंदन. जे वीर या आंदोलनात प्राणास मुकले, त्यांना मी यानिमित्ताने नम्र अभिवादन करतो, असेही ठाकरे यांनी सांगितले.
सरकारला आता उपरती झाली आणि हे कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधानांनी ‘गुरू नानक जयंती’च्या निमित्ताने केली, याचे प्रथम तर स्वागत करतो. महाविकास आघाडीने या कृषी कायद्यांविरुद्ध आपली भूमिका असल्याचे वारंवार सांगितले आहे. शिवाय मंत्रिमंडळात, विधिमंडळातही या कायद्याच्या दुष्परिणामांवर चर्चा केली आहे. केंद्राने यापुढे असे कायदे आणण्यापूर्वी सर्व विरोधी पक्ष तसेच संबंधित संघटना यांना विश्वासात घेऊन संपूर्ण देशाच्या दृष्टीने हिताचा निर्णय घ्यायला हवा म्हणजे आज जी नामुष्की ओढवली आहे असे होणार नाही. हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रियाही लवकरात लवकर होईल, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली.
The post सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली! appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3CAxICD
via
No comments:
Post a Comment