अनिश पाटील
त्रिपुरामधील घटनेचे पडसाद अमरावती, मालेगाव व नांदेड येथे उमटले. त्यानंतर महाराष्ट्र सायबर विभागाने या घटनांबद्दल प्रक्षोभक व चुकीची माहिती पसरविणाऱ्या समाजमाध्यमांवरील संदेशांचा शोध घेतला. त्यातील ३६ पैकी २५ संदेश मुंबईतून समाजमाध्यमांवर टाकण्यात आल्याचे महाराष्ट्र सायबर विभागाच्या प्राथमिक तपासणीत निष्पन्न झाले.
समाजमाध्यमांवरून प्रक्षोभक संदेशाद्वारे गरळ ओकली जाते, मनात भय निर्माण होईल असा मजकूर प्रसारित केला जातो, धर्म, जातीमध्ये तेढ निर्माण होईल असे संदेश पसरविले जातात. अशा संदेशांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलीस दररोज इंटरनेटरवरील मनोवैज्ञानिक लढाई म्हणजेच ‘सायवॉर’शी दोन हात करीत आहेत. समाजमाध्यमांवर प्रक्षोभक संदेशांच्या रूपात टाकलेल्या ठिणगीवरून कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे मुंबई पोलिसांची विशेष शाखाही समाजमाध्यमांवर लक्ष ठेऊन असते.
मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेच्या सोशल मीडिया लॅबने ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ या काळात समाजमाध्यमांवरून २६ हजार ७७७ प्रक्षोभक संदेश हटविले आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने समाजमाध्यमांवर घालण्यात आलेल्या गस्तीत मुंबई पोलिसांना एकूण ४४ हजार ७५६ आक्षेपार्ह संदेश सापडले. त्यातील ४१ हजार ८१ संदेश धार्मिक, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या होत्या. १८२० संदेश चिथावणी देणारे, दहशतवादाशी संबंधित होते. याशिवाय करोनाबाबत चुकीची माहिती पसरवणाऱ्या १८५५ संदेशांचाही त्यात समावेश होता. प्रक्षोभक संदेशांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी विशेष शाखेत कार्यरत ३० पोलिसांचे पथक २४ तास संशयित संदेशांची तपासणी करीत असते. अत्यंत अद्ययावत प्रशिक्षित असलेले हे दल अत्याधुनिक सॉफ्टवेअर, फिल्टर व टुल्सनी सज्ज आहेत.
महाराष्ट्र सायबर विभागही समाजमाध्यमांवर नियमित लक्ष ठेवून आहेत. गेल्या दीड वर्षांत १० हजार ७६ आक्षेपार्ह संदेश शोधण्यात यश आले असून ते हटविण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यातील चार हजार ९७७ संदेश हटविण्यात आले आहेत. त्यात सर्वाधिक म्हणजे सात हजार १४५ संदेश ट्वीटरवर, ९३० संदेश इन्स्टाग्रामवर, १५९४ संदेश फेसबुकवर, यूटय़ूबवरील २७४ चित्रफिती, टिकटॉकवरील १०३, तर अन्य ठिकाणांच्या १९ संदेशांचा समावेश आहे. याबाबत राज्यभरात आतापर्यंत ७५ गुन्हे व २७ अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले होते.
त्रिपुरा येथे नुकत्याच घडलेल्या घटनेचे पडसाद राज्यातही काही ठिकाणी उमटले. त्यानंतर महाराष्ट्र सायबर विभागाने ट्वीटर, फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांवरील ३६ प्रक्षोभक संदेश शोधून काढले. त्याबाबत संबंधित कंपन्यांना पोस्ट हटवण्याची विनंती महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने केलेल्या तपासणीत ट्वीटरवर २५, फेसबुकवर सहा, इन्स्टाग्रामवर पाच प्रक्षोभक, चुकीची माहिती देणारे, धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश सापडले आहेत. याबाबत एक सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने केलेल्या प्राथमिक तपासणीत आयपी अॅड्रेसनुसार यातील बहुसंख्य संदेश मुंबईतून टाकण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासणीत ३६ पैकी २५ संदेश मुंबई पोलिसांच्या हद्दीतील आहेत.
जुलै, २०१२ मध्ये आसाममध्ये दोन गटांमध्ये संघर्ष पेटला होता. त्यानंतर दहा-बारा दिवसांतच त्याचा वणवा दक्षिणेकडील राज्यांतही पसरला. ११ ऑगस्टला त्यावरून मुंबईत मोठा दंगा झाला. देशात अनेक ठिकाणी ईशान्य भारतीयांना लक्ष्य करण्यात आले होते. हा योगायोग नव्हता. पाकिस्तानात उगम असलेल्या संकेतस्थळांवरून, समाजमाध्यम स्थळांवरून, मोबाइल संदेशांतून ईशान्य भारतीयांविरोधात तेव्हा गरळ ओकली जात होती. त्यांच्या मनात भय निर्माण होईल असा मजकूर प्रसारित करण्यात येत होता. हे सरकारच्या लक्षात येईपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली होती. मुंबईत दंगा झाल्यानंतर या गोष्टीचा उलगडा झाला. त्यानंतर तशी सुमारे अडीचशे संकेतस्थळे बंद करण्यात आली. एका दिवशी पाचहून अधिक एसएमएस पाठविण्यावर १५ दिवसांसाठी बंदी घालण्यात आली. पण तोपर्यंत शत्रूला जे साध्य करायचे होते, ते त्यांनी केले होते. समाजमाध्यम हे संपर्काचे एक माध्यम आहे, पण त्याचा गैरवापरही केला जाऊ शकतो. असे प्रक्षोभक, धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश कुणालाही पाठवू नयेत. तसा प्रयत्न कोणी करत असल्यास त्याची माहिती ट्वीटर हॅण्डलद्वारे तात्काळ मुंबई पोलिसांना देणे सहज शक्य आहे. आपणही त्यांच्या या कार्यात खारीचा वाटा उचलायला हवा.
The post शहरबात : समाजमाध्यमे आणि अफवा appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3oNPa1D
via
No comments:
Post a Comment