पन्नास टक्के आसन क्षमतेतही ‘झिम्मा’ आणि ‘पांडू’ गर्दी खेचण्यात यशस्वी
मुंबई : हिंदीत मोठे चित्रपट प्रदर्शित झाले की मराठी चित्रपटांना मोक्याची वेळ मिळवण्यापासून ते प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत आणण्यासाठी प्रत्येक गोष्टीत झगडावे लागते. मात्र सध्या हिंदीत ‘सूर्यवंशी’ आणि ‘अंतिम’ सारखे मोठे चित्रपट असतानाही मराठी चित्रपटांचा गल्ला वाढला आहे.‘झिम्मा’ने आत्तापर्यंत ८ कोटी रुपयांचा पल्ला गाठला आहे. तर गेल्या आठवडय़ात प्रदर्शित झालेल्या पांडूनेही २ कोटींच्या वर कमाई केली आहे.
गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘सूर्यवंशी’ ‘जयंती’ पाठोपाठ प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा’ या चित्रपटाने पहिल्या आठवडय़ात २.९८ कोटी तर दुसऱ्या आठवडय़ात २.८५ कोटी, तिसऱ्या आठवडय़ात २.६१ कोटींची कमाई करत एकूण ८.४४ कोटींची विक्रमी कमाई केली आहे. ‘झिम्मा’ची घोडदौड वेगाने सुरू आहे. प्रत्येक आठवडय़ातील त्याची कमाई लक्षणीय असल्याचे नमूद करत ट्रेड विश्लेषक तरन आदर्श यांनी चित्रपटाचे कौतूक केले आहे. चौथ्या आठवडय़ातही ‘झिम्मा’चे खेळ सुरू असून काही ठिकाणी खास लोकाग्रहास्तव विशेष खेळ आयोजित करण्यात येत आहेत.
विजू माने दिग्दर्शित आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या ‘पांडू’ चित्रपटानेही पहिल्याच आठवडय़ात १.९१ कोटींची कमाई केली. दुसऱ्या आठवडय़ातही या चित्रपटाला चांगली गर्दी होत असून आत्तापर्यंत चित्रपटाने २ कोटींचा आकडा पार केला आहे. टाळेबंदीनंतर फक्त राज्यात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांनी केलेली कमाई देशभरात प्रदर्शित होणाऱ्या हिंदी, दाक्षिणात्त्य सिनेमाच्या तुलनेत लक्षणीय असल्याचे बोलले जाते आहे.
गेले दीड वर्ष मराठी चित्रपटांपासून दूर असलेल्या प्रेक्षकांनी मराठी चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करत निर्मात्यांचा विश्वास वाढवला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत आणखी काही मराठी चित्रपट लागोपाठ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत. अभिनेते सुबोध भावे यांची भूमिका असलेला ‘विजेता’ हा चित्रपट या आठवडय़ात प्रदर्शित झाला आहे. प्रथमेश परब, निखिल चव्हाण आणि रितिका श्रोत्री या तरुण त्रिकुटाचा समीर आशा पाटील दिग्दर्शित ‘डार्लिंग’ हा चित्रपटही या आठवडय़ात प्रदर्शित झाला असून सुयश टिळक – मिताली मयेकर अभिनीत ‘हॅशटॅग प्रेम’ हा चित्रपट पुढच्या आठवडय़ात प्रदर्शित होणार आहे.
प्रेक्षकांना घरात बसून ओटीटीवर चित्रपट पाहण्याचा चांगलाच कंटाळा आला आहे. निखळ आनंद देणारे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आवर्जून चित्रपटगृहात येत आहेत. ‘झिम्मा’च्या निमित्ताने स्त्री वर्ग मोठय़ा प्रमाणात चित्रपटगृहापर्यंत आला हे वैशिष्टय़ टाळेबंदीनंतर पुन्हा एकदा मराठी चित्रपटाला नवचैतन्य मिळाल्याने खूप आनंद झाला आहे.
– हेमंत ढोमे, दिग्दर्शक (झिम्मा)
पहिल्याच आठवडय़ात ‘पांडू’ या चित्रपटाने चांगली कमाई केली असून दुसऱ्या आठवडय़ातही चित्रपटाचे दोनशेपेक्षा अधिक खेळ होत आहेत. टाळेबंदीनंतरही प्रेक्षकांनी मराठी चित्रपटांना आपली पहिली पसंती दर्शवली आहे. त्याशिवाय, हिंदी चित्रपटांच्या बरोबरीने प्रदर्शित होत त्यांना तिकीटबारीवर चांगलीच टक्कर दिली आहे.
– मंगेश कुलकर्णी, व्यवसाय प्रमुख – झी स्टुडिओज
The post मराठी चित्रपटांची तिकीटबारीवर मोठी कमाई appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3IP81CG
via
No comments:
Post a Comment