करोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागताच प्रवासी निर्धास्त
मुंबई : प्रवासी उपनगरीय रेल्वे प्रवासात करोनाविषयक नियमांचे उल्लंघन सर्रास करीत आहेत. प्रवासी मुखपट्टीशिवाय प्रवास करू लागले असून त्याविरोधात कारवाईचा बडगा उचलण्याचे कामही थंडावले आहे. त्यामुळे प्रवासीही निर्धास्तच झाले आहेत. मध्य रेल्वेवर नोव्हेंबर महिन्यात मुखपट्टीशिवाय वावरणाऱ्या १४ आणि पश्चिम रेल्वे व पालिकेच्या संयुक्त कारवाईत एक हजार १४ प्रवाशांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुखपट्टी आणि सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असतानाही अनेक प्रवासी मुखपट्टीशिवाय लोकलमधून प्रवास करीत आहेत. काही जण हनुवटीवर मुखपट्टी ठेऊन, तर काही प्रवाशांची मुखपट्टी खिशात वा हातात दिसते. त्यामुळे अन्य प्रवाशांना करोना संसर्गाचा धोका निर्माण होत आहे. अशा प्रवाशांवर रेल्वे किंवा पालिकेकडून ५०० रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई केली जाते. दंडात्मक कारवाई होऊनही प्रवाशांमध्ये धाक राहिलेला नाही.
मध्य रेल्वेवरील ठाणे, घाटकोपर, कुर्ला तसेच मध्य व पश्चिम रेल्वेवरील दादर, एल्फिन्स्टनसह काही स्थानकांत भेट दिली असता फलाट, पादचारी पुलांवर उभे असलेल्या किंवा वावरणारे प्रवासी करोना नियमावलीचे सर्रास उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आले. काहींची मुखपट्टी हनुवटीवर तर काहीजण मुखपट्टीविनाच वावरत होते. बुटपॉलिश करणारे तसेच खाद्यपदार्थ स्टॉलवरील कर्मचारीही नियमभंग करण्यात आघाडीवर होते. लोकल प्रवासातही हीच स्थिती होती.
दरम्यान, मध्य रेल्वेच्या तिकीट तपासनीसांनी नोव्हेंबरमध्ये मुखपट्टीशिवाय वावरणाऱ्या प्रवाशांविरोधात केलेल्या कारवाईत १४ प्रवासी अडकले आहेत. ऑक्टोबर महिन्यात हीच संख्या २६१ होती. पश्चिम रेल्वेवर तिकीट तपासनीस व पालिकेने केलेल्या संयुक्त कारवाईत नोव्हेंबर महिन्यात एक हजार १४ प्रवाशांवर कारवाई झाली. तर ऑक्टोबरमध्ये हीच संख्या एक हजार ६७२, तर डिसेंबरमध्ये ३९९ इतकी होती असे सांगण्यात आले. दरम्यान, मुखपट्टीशिवाय वावरणाऱ्या प्रवाशांविरोधात नियमानुसार कठोर कारवाई केली जात असल्याचे मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी अनिल जैन यांनी सांगितले.
The post प्रवाशांना मुखपट्टीचा विसर appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3slotF1
via
No comments:
Post a Comment