कारवाईबाबत विद्यापीठ उदासीन
मुंबई : विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यासाठी कल्याण येथील मारिया महाविद्यालयाच्या नावाने खोटे पत्र देऊन मुंबई विद्यापीठाकडून गुणपत्रिका घेण्याचा प्रकार भाईंदर येथील मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कॅटरिंग टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाने केला आहे. या प्रकरणी विद्यापीठाकडे तक्रारही करण्यात आली आहे. मात्र कारवाईबाबत विद्यापीठ उदासीन असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
विद्यापीठाची संलग्नता न मिळाल्याने हा गैरप्रकार घडला असल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात संबंधित महाविद्यालयाने पोलिसात गुन्हा दाखल करूनही विद्यापीठ मात्र कारवाईबाबत गाफील आहे. विद्यापीठाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी अधिसभा सदस्यांकडून करण्यात आली आहे.
शिक्षण एका महाविद्यालयात, परीक्षा आणि गुणपत्रिकाही दुसऱ्या महाविद्यालयात अशी विद्यापीठाची फसवणूक करून मिळवल्याचा प्रकार भाईंदर येथील मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कॅटरिंग टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाने केला आहे. विद्यापीठाची संलग्नता न मिळाल्याने या महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी कल्याण येथील मारिया महाविद्यालयातून बसवले. यासाठी दोन्ही महाविद्यालयांमध्ये ठरावीक रक्कम देऊन करार झाला होता. सप्टेंबर महिन्यात मारिया महाविद्यालयात ९० विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका प्राप्त झाल्या. परंतु आपापसातील वादामुळे मारिया महाविद्यालयाने भाईंदर येथील महाविद्यालयाला गुणपत्रिका देण्यास आडकाठी केली. हा प्रकार विद्यापीठापर्यंत पोहोचल्यानंतर एक बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत गुणपत्रिका देण्याचे मारिया महाविद्यालयाने मान्य केले.
त्यानंतर मारिया महाविद्यालयाने गुणपत्रिका देण्यास सुरुवातही केली. परंतु विद्यार्थ्यांकडे आधीच एक गुणपत्रिका असल्याचे मारिया महाविद्यालयाच्या निदर्शनास आले. याची चौकशी केली असता, भाईंदर येथील महाविद्यालयाने विद्यापीठाशी परस्पर पत्रव्यवहार करून ९० विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका मिळवल्याचे आढळले.
यासंदर्भात मारिया महाविद्यालयाने विद्यापीठाकडे तक्रार केली. मात्र विद्यापीठ कारवाई करीत नसल्याचा आरोप महाविद्यालयाच्या संचालिका मारिया फर्नांडिस यांनी केला आहे. विद्यापीठाशी संपर्क साधला असता तो होऊ शकलेला नाही.
भाईंदर येथील महाविद्यालय चालवणारे दिलीप महाडिक गेली दोन वर्षे आमची फसवणूक करीत आहे. आमच्यामध्ये कोणताही आर्थिक करार झालेला नाही. ही बाब २०१९ मध्येच विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिली होती. परंतु विद्यापीठ त्यांना पाठीशी घालत आहे.
– मारिया फर्नाडिस, संचालक, मारिया महाविद्यालय
आम्ही फसवणूक केलेली नाही. मी मारिया महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी असून सर्व गोष्टींचे पुरावे आहेत. विद्यापीठालाही याची पूर्ण कल्पना आहे. आम्ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करीत आहोत. परंतु आर्थिक लालसेपोटी मारिया महाविद्यालयाच्या संचालिका हा प्रकार घडवून आणत आहेत.
डॉ. दिलीप महाडिक, विश्वस्त, मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कॅटरिंग टेक्नॉलॉजी
विद्यापीठात कोणी एक व्यक्ती खोटा पत्रव्यवहार करून ९० गुणपत्रिका मिळवत असेल तर हे गंभीर आहे. शिवाय महाविद्यालयांमध्ये परस्पर सामंजस्य करार होतात. यामुळे विद्यार्थ्यांचा बळी जात आहे. विद्यापीठातील अधिकारी मध्यस्थ असल्याशिवाय हा गैरप्रकार घडू शकत नाही. याची विद्यापीठाने सखोल चौकशी करावी.
प्रदीप सावंत, अधिसभा सदस्य
The post विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात निकालांचे घोळ appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3EWZ3AU
via
No comments:
Post a Comment