राज्यभरात विलिनीकरणाच्या मागणीसाठी जवळपास दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचाय आंदोलनात आता फूट पडल्याचे दिसून येत आहे. कारण, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांच्या संघटनेने संप मागे घेत असल्याची घोषणा केली असून, कामगारांना कामावर परत येण्याचे आवाहन केले आहे. आज परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशी अजयकुमार गुजर यांनी व त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत अनिल परब यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. मात्र , एककीडे ही घोषणा झाल्यानंतरही आझाद मैदानावर आंदोलक कर्मचारी आपल्या भूमिकेवर व विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याचे सांगत, आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे सांगत होते.
तर, ”विलिनीकरणाच्या मागणीवर आम्ही आजही ठाम आहोत आणि उद्याही ठाम असणार आहोत. परंतु गेल्या दीड महिन्यांपासून हा जो लढा सुरू आहे, तो न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे, आम्ही पुकारलेला लढा हा जवळपास ४५ दिवसांपासून कर्मचारी करत आहेत. तारखेवर तारीख पडत आहे आज न्यायालयात प्राथमिक अहवाल सादर झालेला आहे. आम्ही मंत्री मोहदयांशी चर्चा केली, विलिनीकरणाबाबतचा समितीचा निर्णय दोघांनाही मान्य राहणार आहे. ” असं अजयकुमार गुजर यांनी सांगितलं आहे. तसेच, एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाचा लढा न्यायालयावर सोपवलेला आहे. न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य असेल. राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की, सर्व कर्मचाऱ्यांनी आपण पुकारलेला लढा चर्चा केल्याप्रमाणे आता थांबवत आहोत. २२ डिसेंबरपर्यंत तुम्ही कामावर हजर व्हा. आपल्यावरील कारवाई मागे घेण्याची विनंती आम्ही केली आहे, असही गुजर यांनी सांगितलं आहे.
माध्यमांशी बोलताना अनिल परब म्हणाले की, ”२१ ऑक्टोबर २०२१ रोजी संपाची नोटीस दिली गेली होती. त्यानंतर ३ नोव्हेंबर २०२१ रोजी मध्यरात्रीपासून संप सुरू झाला होता. ज्या कर्मचारी संघटनेच्या नोटीसवरून हा संप सुरू झाला होता, गेले ५४ दिवस हा संप सुरू आहे. या संपाच्या विविध पातळ्यांवरती आम्ही सतत संपकरी कर्मचाऱ्यांशी बोलत होतो आणि हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलं होतं. संप करू नका असे औद्योगिक न्यायालयाचे आदेश होते. त्यावर आम्ही अवमान याचिका दाखल केली होती. त्यामध्ये या दरम्यानच्या काळात उच्च न्यायालयाने, जी कर्मचाऱ्यांची मागणी होती. की राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे विलिनीकरण शासानात करावं, त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सगळे लाभ मिळावेत. या मागण्यांसाठी जो संप सुरू होता आणि त्याबाबतीतील आमची भूमिका आम्ही सतत मांडत होतो. आमची भूमिका अतिशय स्पष्ट होती की, उच्च न्यायालयाने एक त्रिसदस्यीय समिती, स्थापन केलेली आहे आणि विलिनीकरणाच्या मुद्य्यावर ही समिती १२ आठवड्यांच्या आत आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना देईल. मुख्यमंत्री त्यावर आपला अहवाल देऊन हा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात येईल.”
”आम्ही वारंवार याबाबत सांगत होतो की, एवढा मोठा कालावधी जो आहे तोपर्यंत संप करू नका. कामगारांना कामावर येऊ द्या आणि या मागणीच्या व्यतिरिक्त बाकीच्या मागण्यांसाठी आमची चर्चेची दारं खुली आहेत. आपण चर्चेसाठी यावं, चर्चा करावी अशी आमची सततची भूमिका होती. या दरम्यानच्या काळात राज्य शासनातर्फे परिवहन मंडळातर्फे पाच हजार रुपये हे कामगारांच्या एक ते दहा वर्षे ज्यांची नोकरी झालेली आहे, त्यांच्या मूळ वेतनात आम्ही दिले. ज्यांची नोकरी १० ते २० वर्षे झालेली आहे, अशा कर्मचाऱ्यांना आम्ही चार रुपये दिले आणि ज्यांची नोकरी २० वर्षांपेक्षा जास्त झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांना आम्ही अडीच हजार रुपये दिले. शासनाच्यावतीने उचलेलं हे पाऊल होतं आणि आम्ही याबाबत कर्मचाऱ्यांना सतत आवाहन करत होतो, की विलिनीकरणाचा मुद्दा सोडून आम्ही जे पाऊल उचललेलं आहे आपण त्याला प्रतिसाद द्या, कामावर या आणि आपण चर्चा करून बाकीचे सर्व प्रश्न सोडवू शकतो. आमच्या चर्चेला प्रतिसाद देत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर व त्यांचे सरचिटणीस आणि त्यांच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी आज मंत्रालयात आमच्याशी चर्चा केली. आम्ही या सगळ्या चर्चेच्या अंती ज्या गोष्टी मान्य केल्या आहेत, त्यामध्ये जो प्रमुख मुद्दा होता विलिनीकरणाचा या मुद्य्यावर हा मुद्दा त्रिसदस्यीय समितीच्या समोर आहे आणि ती समिती जो अहवाल देईल, तो आम्हाला दोघांनाही मान्य असेल. राज्य परिवहन मंडळाला देखील मान्य असेल आणि कर्मचाऱ्यांना देखील मान्य असेल असं आजच्या बैठकीत ठरलं आहे.”
”याचबरोबर त्यांनी आमच्याकडे काही मागण्या देखील केल्या होत्या, ज्यामध्ये आर्थिक मागण्या होत्या, काही बदल सुचवले होते. आर्थिक मागण्यांच्याबाबतीत त्यांनी अशी मागणी केली होती की, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला पगार मिळावेत. आम्ही जी मूळ पगारात वाढ करून, त्यांना एका बऱ्याच चांगल्या स्तरावर नेवून ठेवलं आहे. परंतु, आम्ही हे देखील मान्य केलं आहे की याबाबत आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहोत. त्याचबरोबर, त्यांची दुसरी मागणी होती की ज्या कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची किंवा बडतर्फीची कारवाई झालेली आहे. कामगार कामावर आल्यानंतर त्यांच्यावरील कारवाई मागे घ्यावी. आम्ही यावर असं मंजुर केलं आहे की, कामगार कामावर येऊन जर डेपो सुरू झाले तर आम्ही ताबडतोब कारवाई मागे घेऊ. फक्त यामध्ये फौजदारी कारवाई ज्यांच्यावर झालेली आहे, त्यांची प्रकरणं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच आम्ही त्याबाबतीत निर्णय़ घेऊ. या चर्चेत आर्थिक मागण्या ज्या त्यांच्या होत्या, त्यामध्ये वेळेवर पगार व्हावा अशी मागणी होती. याबाबत आम्ही मागेच कबूल केलेलं आहे की, दहा तारखेच्या आतमध्ये महामंडळाचा पगार होईल आणि त्याची जबाबदारी राज्य शासनाने घेतलेली आहे. उर्वरित ज्या त्यांच्या आर्थिक मागण्या होत्या, ज्यामध्ये कामगारांचा विमा, मेडीक्लेम या सगळ्यांवर चर्चा करण्याची आम्ही तयारी दर्शवली आहे.”
”याशिवाय ज्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे, त्यांची सगळी प्रकरणं तपासून बघितली जातील. त्याचे आम्ही पोलीस अहवाल देखील मागवलेले आहेत आणि त्यांच्या वारसांना नोकरी मिळाली पाहिजे, म्हणून आम्ही महामंडळाकडे हा प्रस्ताव ठेवू. महामंडळाच्या बैठकीत यावर विचार केला जाईल, ही देखील आम्ही त्यांचा सकारात्मक विचार करण्याची मागणी मान्य केलेली आहे. एकंदर विलिनीकरणचा मुद्दा हा जो समिती अहवाल देईल, त्याप्रमाणे आम्ही मान्य करू. बाकीची जी आर्थिक विषय आहेत त्याबाबत आम्ही त्यांच्याशी चर्चा करण्याची आम्ही मागणी मान्य केलेली आहे. आम्ही कर्मचाऱ्यांना२२ डिसेंबरपर्यंत कामावर हजर होण्याचं आवाहन केलेलं आहे. जे मुंबईबाहेरून कर्मचारी आलेले आहेत त्यांना जाण्यासाठी दोन दिवस लागतील, अशा कर्मचाऱ्यांना एक दिवसाची सवलत आम्ही अजुन देऊ.”
”मला असं वाटतं की कर्मचाऱ्यांना देखील दीड महिन्यापासून काम न केल्यामुळे पगार मिळालेला नाही. त्यांच्या देखील बऱ्याच अडचणी आहेत. बरचसे कामगार आम्हाला आजही संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. कर्मचाऱ्यांनी कामावर यावं आणि आपलं काम सुरू करावं आम्ही सुरूवातीपासून ही भूमिका घेतलेली आहे, की चर्चेतून प्रश्न सुटू शकतात आणि म्हणून आज तसा प्रयत्न केलेला आहे.” असंही परब यांनी यावेळी सांगितलं.
The post ST Workers Protest : अजयकुमार गुजर प्रणित संघटनेची संप मागे घेत असल्याची घोषणा appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3sipBsV
via
No comments:
Post a Comment