नेते, अभिनेते, व्यावसायिक अनेकांवर केलेल्या धडक कारवाईमुळे गेल्या काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत असलेल्या ईडीची आता पुन्हा चर्चा होत आहे. मुंबईतलं ईडीचं हे ऑफिस आता जिथे शिफ्ट होणार आहे, ती जागा या चर्चेमागचं कारण आहे. ही जागा आहे एकेकाळचा गँगस्टर इकबाल मिरची याची.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ही जागा कोणे एके काळी गँगस्टर इकबाल मेमन उर्फ इकबाल मिरची याने विकत घेतली होती. मात्र जप्तीच्या कारवाईनंतर ईडीचे नवे कार्यालय या सीजे हाऊसमध्ये हलवण्यात येणार आहे. हे कार्यालय एका प्रसिद्ध राजकीय नेत्याने बांधल्याची माहिती आहे. ईडीचं सध्याचं झोनल ऑफिस मुंबईतील बॅलार्ड इस्टेट परिसरातील कैसर ए हिंद इमारतीच्या तळ मजल्यावर आहे.
सीजे हाऊस हे वरळी विभागातील डॉ. अॅनी बेझंट रोडवर आहे. पूर्वी ते एम के मोहम्मद यांच्या मालकीचं होतं. मात्र, या जागेचा मालक आणि मोहम्मद यांच्या कुटुंबियात वाद होता. गँगस्टर इकबाल मिरची याने १९८६ साली ही जागा दोन लाख रुपयांना त्याची पहिली पत्नी हजरा हिच्या नावावर विकत घेतली. यानंतर आजूबाजूची जागा बळकावून त्याने त्या जागेत फिशरमन नावाचा पब सुरु केला. १९९० च्या काळात इकबाल मिरची हा ड्रग्जचा मोठा तस्कर होता. यंत्रणा त्याच्या मागावर होती. १९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातही त्याचं नाव घेतलं जात होतं.
दरम्यान, यंत्रणेने कारवाई करत मिरचीचा हा पब जप्त केला. हीच जागा पुढे मिरची याने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने मिलेनियन डेव्हलपरला विकली. मिलेनियन डेव्हलपरने या ठिकाणी सीजे हाऊस उभारले आहे. जागेच्या विक्रीच्या व्यवहारात मिरची याच्या कुटुंबियांना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ९००० चौरस फूट, तर पाचव्या मजल्यावर ५००० चौरस फूट जागा देण्यात आली होती. या प्रकरणात ईडीने कारवाई केली आहे. इकबाल मिरची याच्या कुटुंबावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या या अनुषंगाने इमारतीतील जागा जप्त करण्यात आली. आता या जागेचा लिलाव करण्याऐवजी इमारतीत ईडी आपलं विभागीय कार्यालय उभारणार आहे.
The post ‘या’ कुख्यात ड्रगमाफियाच्या जागेवर उभं राहणार ईडीचं नवं कार्यालय; जाणून घ्या या जागेचा रंजक इतिहास appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3Fb3Y0m
via
No comments:
Post a Comment