आठवडय़ाची मुलाखत : ऐतिहासिक ऐवजाचा शतकी खजिना - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Monday, January 10, 2022

आठवडय़ाची मुलाखत : ऐतिहासिक ऐवजाचा शतकी खजिना

मनीषा नेने, संचालिका, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय

दक्षिण मुंबईमधील फोर्ट परिसरातील ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया’ला १० जानेवारी २०२२ रोजी १०० वर्षे पूर्ण झाली. महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण भारताचा शेकडो वर्षांचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा या संग्रहालयाने जतन करून ठेवला आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून अभ्यासू संशोधकांपर्यंत सर्वानाच शैक्षणिक आणि सांस्कृतिकदृष्टय़ा समृद्ध करणाऱ्या या संग्रहालयाचे महत्त्वाचे पैलू आणि त्यातील दालनांच्या निर्मितीचा प्रवास सांगत आहेत संचालिका मनीषा नेने..

  • आपण ज्या संस्थेचे नेतृत्व करतो ती संस्था शतक महोत्सवी टप्पा पार करत आहे हे पाहून काय वाटते ?

ही एक अतिशय समाधानाची व आनंदाची गोष्ट आहे. सगळय़ात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या १०० वर्षांपैकी ३२ वर्षे मी या संग्रहालयाचा भाग आहे.

  •   ३२ वर्षांच्या कारकिर्दीत तुम्ही संग्रहालयाला कशा प्रकारे बदलताना पाहिले आहे ?

या काळात वस्तुसंग्रहालयाला काळानुसार बदलताना पाहिले आहे. सुरुवातीपासूनच आमचे संग्रहालय एक प्रगतशील संग्रहालय आहे. हे फक्त एक प्रेक्षणीय स्थळ न राहाता सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र बनले आहे. जगाच्या नकाशावर या संग्रहालयाचे नाव कोरले गेले आहे.

  •   मुंबईसारख्या ठिकाणी अनेक कलादालने, संग्रहालये असतात. अशा स्थितीत ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया’चे वेगळेपण काय आहे ?

हे संग्रहालय म्हणजे केवळ वस्तूंचा संग्रह नाही. येथील दालनांचे वेगळेपण म्हणजे वैविध्यपूर्ण, वैश्विक संग्रह आणि नावीन्यपूर्ण मांडणी. त्यात अगदी पुरातन काळापासून ते समकालीन वस्तूंचा समावेश आहे. एखादी वस्तू संग्रहालयात आल्यानंतर आवश्यकता असल्यास त्यावर संवर्धनाची प्रक्रिया केली जाते. येथे एकूण २२ दालने आहेत. प्रत्येक दालनाची संकल्पना वेगळी आहे. कुठे काळानुसार तर कुठे वस्तूंनुसार मांडणी केलेली आहे. वस्त्रांच्या दालनामध्ये लहान बाळाचे कपडे, मुंजीचा पोशाख, लग्नसोहळय़ांमध्ये नेसल्या जाणाऱ्या साडय़ा, इत्यादी वेगवेगळय़ा प्रकारच्या पोशाखांचा समावेश आहे. हिमालयीन दालनाची निर्मिती करताना आम्ही प्रत्यक्ष त्या परिसराला भेट दिली. लडाखहून आलेले तीन कलाकार संग्रहालयात राहिले आणि तेथे असते तशी मातीची मैत्रेयाची (बुद्धाची) मूर्ती त्यांनी घडवली. संग्रहालयात येणारे प्रेक्षक वेगवेगळय़ा स्तरांतून येतात. त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन वस्तूंची मांडणी केली जाते. वस्तू टिकून राहण्यासाठी प्रकाश किती असावा याचीही काळजी घेतली जाते. तसेच वस्तूंची माहिती लिखित, दृकश्राव्य अशा दोन्ही पद्धतींनी दिली जाते.

  • टाळेबंदीमध्ये एक सशक्त आणि लोकप्रिय पर्याय म्हणून समोर आलेल्या ऑनलाइन व्यासपीठावर संग्रहालयाचे स्थान कसे आहे ?

 टाळेबंदी काळात आमच्या संग्रहालयाने ऑनलाइन माध्यमाचा अत्यंत चांगला परिणामकारक उपयोग करून आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. असे कार्यक्रम काळाची गरज आहे. हे जाणून नावीन्यपूर्ण कार्यक्रम सादर केले आहेत आणि ते अगदी लहान मुले आणि मोठय़ांसाठीही आहेत. संग्रहालयातील दालनांची आभासी सफर संकेतस्थळावर उपलब्ध आहे; पण संग्रहालयांनी ऑनलाइन आणि प्रत्यक्ष अनुभव यांत समतोल साधला पाहिजे.

  •   राजाश्रय आणि लोकाश्रयाच्या पातळीवर संग्रहालयाचा अनुभव कसा आहे ?

 भारतात संग्रहालयाला हवे तेवढे महत्त्व आजही दिले जात नाही. त्यामुळे संग्रहालयांनीच आता लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. म्हणूनच आम्ही ‘फिरते वस्तुसंग्रहालय’ सुरू केले. ही बस विविध प्रदर्शने घेऊन खेडय़ापाडय़ांमध्ये जाते. वर्षभर विविध प्रदर्शने आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जात असल्याने प्रत्यक्ष संग्रहालयालाही लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. टाळेबंदीनंतर आम्ही सुरू केलेल्या योजनेंतर्गत अनेकांनी संग्रहालयातील वस्तू दत्तक घेतल्या. त्यातून संग्रहालयाला आर्थिक पाठिंबा मिळाला. संग्रहालयातील वस्तू हा राष्ट्रीय ठेवा आहे. त्यामुळे शासनाकडून नियमितपणे काही अर्थसाहाय्य मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी वेळोवेळी प्रयत्नही झाले आहेत. २००८ साली एकदाच केंद्र शासनाकडून अनुदान मिळाले होते. 

  •   १०० वर्षांत कोणत्या गोष्टीची कमतरता राहिली असे वाटते ?

आर्थिक कमतरता आहे. संग्रहालयातील वस्तू खूपच महागडय़ा असतात. त्यांची दैनंदिन देखभाल आणि कर्मचाऱ्यांचे वेतन यासाठी भरपूर खर्च होतो. आतापर्यंत खासगी कंपन्यांच्या ‘सामाजिक उत्तरदायित्व निधी’ची मदत घेण्यात आली आहे.

  • संग्रहालय हे करिअर म्हणून कसे आहे ?

हे क्षेत्र अजून बऱ्याच जणांसाठी अपरिचित आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया’तर्फे संग्रहालयशास्त्राचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम चालवला जातो. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. २० जागांसाठी १०० अर्ज येतात. या अभ्यासक्रमात संग्रहालयाचे व्यवस्थापन, वस्तूंची मांडणी, इत्यादी गोष्टी शिकता येतात.

 मुलाखत : नमिता धुरी

The post आठवडय़ाची मुलाखत : ऐतिहासिक ऐवजाचा शतकी खजिना appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3JX8hQm
via

No comments:

Post Bottom Ad

Pages