चेंबूर, शीव परिसराची पावसाळ्यातील जलकोंडी टळणार
मुंबई : पावसाळय़ात पूर्व उपनगरांतील सखलभागांना जलमुक्ती देण्यासाठी प्रस्तावित असलेल्या माहुल उदंचन केंद्रासाठी आणिक परिसरात तब्बल १५ हजार ५०० चौरस मीटर जागा उपलब्ध झाली आहे. पालिकेच्या मालकीच्या जागेच्या बदल्यात हा भूखंड उपलब्ध होणार असून त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले माहुल उदंचन केंद्र उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. परिणामी, पावसाळ्यात पूर्व उपनगरातील गांधी मार्केट, किंग्ज सर्कल, नेहरूनगर, चेंबूर परिसरातील सखलभागांत साचणाऱ्या पाण्यापासून मुक्ती मिळणार आहे.
चारही बाजूने समुद्राने वेढलेल्या मुंबईत दरवर्षी अतिवृष्टीच्या वेळी पावसाचे पाणी साचते. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी शहरात शिरत असल्यामुळे पातमुख बंद करावे लागतात. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक पद्धतीने निचरा होऊ शकत नाही. त्यावर उपाय म्हणून ब्रिमस्ट्रोवॅड अहवाल आणि चितळे समितीच्या शिफारशीनुसार मुंबईत आठ ठिकाणी पर्जन्य जल उदंचन केंद्रे उभारण्याचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला होता. त्यापैकी हाजीअली, ईर्ला, लवग्रोव, क्लिव्हलॅण्ड, ब्रिटानिया आणि गझदरबंध ही सहा उदंचन केंद्रे बांधून कार्यान्वित झाली आहेत. तर अंधेरी येथील मोगरा नाल्यावरील उदंचन केंद्राचेही कामही लवकरच सुरू होणार आहे. मात्र माहुल येथील उदंचन केंद्राचे काम जागेअभावी रखडले होते. त्यामुळे शीव, चेंबूर या परिसरातील पावसाच्या पाण्याची समस्या सुटत नव्हती. आता मात्र पालिकेला पर्यायी जागा उपलब्ध झाल्यामुळे हा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे.
गेल्या आर्थिक वर्षांत पालिकेने मोगरा व माहुल या दोन उदंचन केंद्रासाठी निविदा मागवल्या होत्या. मात्र जमीन अधिग्रहण होऊ न शकल्यामुळे या निविदा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर मोगरा उदंचन केंद्र हे नाल्याच्या प्रवाहातच बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र माहुल उदंचन केंद्रासाठी लागणारी जमीन ही केद्र सरकारच्या अखत्यारीत होती. पालिका प्रशासनाने मिठागर आयुक्तांकडे या जमीन हस्तांतरणाबाबतचा पाठपुरावा केला होता. मात्र गेल्या वर्षभरात त्याबाबत काहीही प्रगती झाली नव्हती.
त्यामुळे अखेर पालिकेने आता आणिक परिसरातील खासगी विकासकाच्या मालकीची १५ हजार ५०० चौरस मीटर जागा या प्रकल्पासाठी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबदल्यात पालिका आपल्या अखत्यारीतील भूखंड खासगी विकासकाला देणार आहे. त्याबाबतची आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून पालिका आयुक्तांनीही त्याला मंजुरी दिली आहे. जमीन अदलाबदल करण्याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीकडे पाठवण्यात आला आहे. मात्र विधान परिषदे निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आता या जागेबाबतच्या प्रस्तावावर निर्णय होऊ शकणार नाही.
The post माहुल उदंचन केंद्र आणिक परिसरात appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/30UAbuw
via
No comments:
Post a Comment