कोकण मंडळ सोडत २०२१; खोणी, शिरढोण, विरारमधील घरांचा समावेश
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाने २०२१ मध्ये काढलेल्या सोडतीमधील ३०४ सदनिकांना प्रतिसाद मिळाला नसल्याची बाब उघडकीस आली आहे. आठ हजार ९८४ सदनिकांसाठी दोन लाख ४६ हजार अर्ज सादर झाले होते. असे असतानाही ३०४ सदनिकांसाठी एकही अर्जच आला नाही. खोणी, शिरढोण आणि विरारमधील सदनिकांचा त्यात समावेश आहे. विशेष म्हणजे मागील सोडतीत पंतप्रधान आवास योजनेतील यातील काही सदनिका विजेत्यांनी परत केल्या होत्या.
कोकण मंडळानेतीन वर्षांनंतर कोकणातील ८,९८४ सदनिकांसाठी १४ ऑक्टोबर रोजी सोडत काढली होती. या सोडतीला इच्छुकांनी भरभरून प्रतिसाद दिला. दोन लाख ४६ हजार अर्ज आले होते. पंतप्रधान आवास योजनेतील ६,१८० सदनिकांसाठी ११ हजार २८५, कोकण मंडळाच्या गृहप्रकल्पातील १,९९२ सदनिकांसाठी २८ हजार १९७, तर २० टक्क्यातील ८१२ सदनिकांसाठी सर्वाधिक दोन लाख ७ हजार अर्ज सादर झाले होते. पण इतक्या मोठय़ा संख्येने सोडतीला प्रतिसाद मिळूनही ३०४ सदनिकांची या सोडतीत विक्रीच होऊ शकली नाही. या घरांसाठी प्रतिसादच मिळालेला नाही.
म्हाडातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विरार, बोळींज येथील संकेत क्रमांक २७४ मधील अल्प गटातील १४९ सदनिका, संकेत क्रमांक २६३ ब मधील १२ सदनिका आणि २६४ ब मधील पाच सदनिका तर तर पंतप्रधान आवास योजनेतील शिरढोण येथील संकेत क्रमांक २७० अ मधील ७७ आणि खोणी येथील ६० सदनिकांना प्रतिसाद मिळाला नाही. मागील सोडतीत पंतप्रधान आवास योजनेतील या सदनिका विजेत्यांनी परत केल्या होत्या. या सदनिका पुढील सोडतीत समाविष्ट करण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र बहुतांश सदनिका सामाजिक आरक्षणातील असल्यामुळे पुढील सोडतीतही त्या विनाविक्री पडून राहण्याची शक्यता आहे.
सोडतीमधील आठ हजार ९८४ पैकी ३०४ सदनिकांना प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे या सदनिका विकल्या गेलेल्या नाहीत. सामाजिक आरक्षणातील संवर्गासाठी अर्ज कमी आले असून ही घरे याच संवर्गातील आहेत. आता ही घरे पुढील सोडतीत समाविष्ट करण्यात येणार आहेत.
–नितीन महाजन, मुख्य अधिकारी, कोकण मंडळ, म्हाडा
The post म्हाडाच्या ३०४ सदनिका विक्रीविना appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3nKSDyI
via
No comments:
Post a Comment