मुंबई: राज्यात सर्व निर्बंध शिथिल झाल्यानंतरही रुग्णसंख्येत फारशी वाढ झाली नसली तरी ११ ते २० वयोगटातील १ हजार ७११ बालके मुले गेल्या २० दिवसांत करोनाबाधित झाल्याचे आढळले आहे. मुले बाधित होण्याचे प्रमाण काही अंशी वाढले आहे. परंतु तरीही या वयोगटामध्ये मृत्यूचे किंवा गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढले नसल्याने फारशी चिंता करण्याची आवश्यकता नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
राज्यात दिवाळीनंतर काही प्रमाणात रुग्णसंख्या वाढण्याचा धोका व्यक्त केला जात होता, परंतु त्या तुलनेत रुग्णसंख्या फारशी वाढलेली नाही. गेल्या २० दिवसांत राज्यात सुमारे २० हजार रुग्णांची नव्याने भर पडली आहे. यात ११ ते २० वयोगटातील मुलांचे प्रमाण सुमारे ८ टक्के आहे.
राज्यातील ३१ ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार राज्यात शून्य ते १० वयोगटातील २ लाख ११ हजार ४१६ बालके, तर ११ ते २० वयोगटातील ४ लाख ९४ हजार ४०४ मुले बाधित झाली होती. २१ नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार, शून्य ते १० वयोगटातील बालकांमध्ये किंचित वाढ झाली असून २० दिवसांमध्ये ६५४ बालके बाधित झाली. ११ ते २० वयोगटातील बाधित मुलांचे प्रमाण याहून जास्त असून २० दिवसांमध्ये १ हजार ७११ बालके बाधित झाली आहेत.
प्रौढांचे लसीकरण सुरू असले तरी अजून मुलांसाठी लस उपलब्ध झालेली नाही. त्यात आता सर्व निर्बंध शिथिल केल्यानंतर शाळा, महाविद्यालयेही सुरू झालेली आहेत. त्यामुळे ११ ते २० वयोगटातील मुलांच्या बाधित होण्याच्या प्रमाणामध्येही वाढ नक्कीच झाली आहे, परंतु यात गंभीर होणाऱ्या रुग्णांचे किंवा मृत्यूचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे चिंतेचे कारण नाही, असे बालरोगतज्ज्ञांच्या समितीचे प्रमुख डॉ. सुहास प्रभू यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.
मुलांमध्ये बाधितांचे प्रमाण वाढणे अपेक्षितच होते. त्यामुळे पालकांनी आणि बालकांनीही करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तरी करोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, असे समितीचे सदस्य डॉ. विजय येवले यांनी सांगितले.
जोखमीच्या गटातील मुले
जोखमीच्या गटातील बालकांचे लसीकरण प्राधान्याने करण्याची शिफारस आहे. कर्करोग, एचआयव्ही अन्य आजारांनी ग्रस्त किंवा रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या बालकांना करोनाचा धोका अधिक असतो. ती शक्यता लक्षात घेऊन त्यांचे लसीकरण झाल्यानंतर सर्व मुलांना प्राधान्याने लस देण्याची शिफारस समितीने राज्य सरकारकडे केली आहे, असे डॉ. प्रभू यांनी सांगितले.
जानेवारीनंतरच मुलांना लस?
मुलांचे लसीकरण जानेवारीनंतरच सुरू होण्याची शक्यता आहे. प्रौढांचे लसीकरण डिसेंबपर्यंत जास्तीत जास्त पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. यानंतर म्हणजेच जानेवारीनंतरच मुलांचे लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. मुलांपेक्षाही प्रौढांना धोका अधिक असल्यामुळे त्यांचे लसीकरण प्राधान्याने होणे आवश्यक आहे, परंतु त्याच वेळी जोखमीच्या बालकांचे लसीकरणही खुले करणे गरजेचे आहे, असे मत डॉ. प्रभू यांनी व्यक्त केले.
शाळा सुरू करण्यास संमती
समितीने दिलेली मार्गदर्शक तत्त्वे पूर्ण केली असल्यास पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्यास संमती दिली आहे. यासंबंधी अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला असून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे डॉ. येवले यांनी सांगितले.
शाळांमध्येच लसीकरण
गोवर-रुबेलाप्रमाणे शाळांमध्येच मुलांचे लसीकरण करण्याच्या पर्यायाचाही सध्या विचार केला जात आहे. लसीकरण केल्यानंतर कोणत्या बाबी आवश्यक आहेत, यासंबंधीची मार्गदर्शक तत्त्वेही तयार करण्यात येतील, असे डॉ. प्रभू यांनी सांगितले.
The post ११ ते २० वयोगटातील १,७११ मुले बाधित ; २० दिवसांत रुग्णसंख्येत वाढ, चिंतेचे कारण नसल्याचे तज्ज्ञांचे मत appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3x8q0OV
via
No comments:
Post a Comment