दररोज एका प्रस्तावाला मंजुरी; प्राधिकरणाला प्रीमियमपोटी ११७२ कोटींचे उत्पन्न
मुंबई : म्हाडा इमारतींच्या पुनर्विकास योजना मंजूर होण्याचे गेल्या काही महिन्यांतील प्रमाण पाहता कागदावर तरी जोर दिसून येत आहे. या वेग पाहिला तर सरासरी प्रत्येक दिवसाला एक योजना मंजूर होत आहे. प्रीमिअममध्ये ५० टक्के सूट आणि तीही हप्त्याहप्त्याने भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे म्हाडा इमारतींचा पुनर्विकास करणाऱ्या विकासकांनी चटईक्षेत्रफळ आरक्षित करून ठेवले आहे.
गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हे एकीकडे म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास खासगी विकासकामार्फत राबविण्याची घोषणा करीत असल्यामुळे अभिहस्तांतरण झालेल्या म्हाडा इमारती पुनर्विकासासाठी घेतलेल्या विकासकांनीही आपल्यावर कारवाई होऊ नये, यासाठी घाईघाईने प्रकल्पाचे काम सुरू केल्याचे दाखविण्यासाठी चटईक्षेत्रफळ आरक्षित करण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे. यंदा एप्रिल ते ऑगस्ट २०२१ची आकडेवारी उपलब्ध झाली असून त्यानुसार १५९ योजनांना मंजुरी दिल्याचे दिसून येत आहे. हे प्रमाण पाहता प्रत्येक दिवसाला एक योजना मंजुरी दिल्याचे स्पष्ट होते. प्रीमिअमपोटी म्हाडाला ११७२ कोटी रुपये मिळाले आहेत. आतापर्यंत इतकी मोठी रक्कम म्हाडाला पहिल्यांदाच काही महिन्यांत मिळाली आहे.
म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास वेळेत पूर्ण न झाल्यास ती योजना ताब्यात घेतली जाईल, या गृहनिर्माणमंत्र्यांच्या घोषणेचा चांगलाच परिणाम दिसून येत असून त्यानंतरच म्हाडाच्या पुनर्वसन कक्षाकडे योजना मंजुरीसाठी रांग लागली. जुलै २०१७ पासून आतापर्यंत म्हाडा पुनर्विकासाच्या माध्यमातून गोळा होणाऱ्या २२०० कोटी रुपये म्हाडाला मिळाले आहेत. त्यामुळे म्हाडाच्या मालकीच्या वसाहतींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू करणे शक्य होणार असल्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. पत्रा चाळ, मोतीलाल नगर (गोरेगाव), सरदार वल्लभभाई पटेल नगर (अंधेरी) आणि अभ्युदयनगर या म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले.
The post म्हाडात पुनर्विकासाचे वारे जोरात! appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3oDd0gt
via
No comments:
Post a Comment