विभागांमध्ये विशेष लसीकरण शिबिरे राबवण्यात अडचणी
मुंबई : एकीकडे शहरात करोना प्रतिबंधात्मक लसीकरण वाढविण्यासाठी पालिकेने जोर दिला आहे, तर दुसरीकडे विभागांमधील लसीकरण केंद्रावरील रुग्णवाहिकांची संख्या कमी केली आहे. त्यामुळे मोठय़ा विभागांमध्ये लसीकरणानंतर व्यक्तीला काही त्रास झाल्यास तातडीने सेवा देण्यासाठी रुग्णावाहिका उपलब्ध कशी करावी असा प्रश्न विभागांसमोर निर्माण झाला आहे. तसेच गृहनिर्माण संकुलांमध्ये लसीकरण करण्यात अडचणी येत आहेत.
करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये लसीकरणाचा जोरही कमी झाला. त्यामुळे लसीकरण केंद्रावरही तुरळक नागरिक लसीकरणासाठी येऊ लागले. परिणामी, पालिकेने लसीकरण केंद्रांसाठी दिलेल्या रुग्णावाहिकांच्या संख्येत कपात केली. यामुळे विभागातील रुग्णवाहिकांची संख्या जवळपास निम्म्याने कमी झाली. परंतु आता ओमायक्रॉनच्या भीतीने डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून लसीकरणासाठी पुन्हा गर्दी वाढायला सुरुवात झाली आहे. पालिकेनेही लसीकरण वेगाने करण्यासाठी गेल्या महिनाभरात गृहनिर्माण संकुले, दूरवरचे भाग यामध्ये लसीकरण शिबिरे आयोजित करण्यावरही भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पूर्वी जवळच्या एक ते दोन केंद्रांमध्ये मिळून एक रुग्णवाहिका होती. त्यामुळे एखाद्या रुग्णाला त्रास झाल्यास तात्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात नेणे शक्य होते. परंतु आता पालिकेने रुग्णवाहिकांची संख्या कमी केली असून चार केंद्रांमध्ये एक रुग्णवाहिका उपलब्ध आहे. त्यात आमच्या विभागामध्ये टेकडय़ांवर झोपडपट्टी पसरलेली आहे. येथे शिबिरांचे आयोजन करण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर केला जात होता. रुग्णवाहिकांची संख्या कमी झाल्याने येथे शिबिरे आयोजित करण्यासाठी पुरेशी वाहने उपलब्ध नाहीत. त्यामुळे या विभागांमध्ये लसीकरण कसे वाढविणार असा प्रश्न उपनगरीय विभागातील पालिकेच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. आमच्या विभागात १८ केंद्रामध्ये सध्या सहा रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. मधल्या काळात रुग्णसंख्या कमी झाली आणि लसीकरणही कमी संख्येने होत असल्यामुळे फारशी अडचण जाणवत नव्हती. परंतु विभागात गृहनिर्माण संकुलामध्ये शिबीर आयोजित करायचे असल्यास आम्हाला एखादे केंद्र बंद ठेवावे लागते, असे अंधेरी विभागातील डॉक्टरांनी सांगितले. .. लसीकरणानंतर दुष्परिणाम जाणवण्याचे प्रमाण तुलनेने अत्यंत कमी आहे. दोन ते तीन केंद्रांमध्ये रुग्णवाहिका दिलेली आहे. रुग्णावाहिकांचा फारसा वापर होत नसल्यामुळे त्या कमी केल्या आहेत. त्यातही एखाद्या विभागाला आवश्यकता असल्यास रुग्णवाहिका वाढवून दिल्या जातील, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
The post लसीकरण केंद्रावरील रुग्णवाहिकांच्या संख्येत कपात appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3pWoBaZ
via
No comments:
Post a Comment