ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल; आणखी काही दिवस वेळापत्रक विस्कळीत होण्याची शक्यता
मुंबई : मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर काही स्थानकांदरम्यान सुरू असलेल्या रुळांच्या कामांमुळे तेथे लोकल गाडय़ांना वेगमर्यादा घालून देण्यात आली आहे. या कामांमुळे मंगळवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी लोकलचे वेळापत्रक काहीसे विस्कळीत झाले. लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावू लागल्या. सुमारे पाच तास याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसला. रुळांची कामे आणखी काही दिवस सुरू राहणार आहेत. परिणामी, लोकलचे वेळापत्रक विस्कळीत होण्याची शक्यता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वर्तविली आहे.
मध्य रेल्वेवरील सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या जलद आणि धिम्या लोकल गाडय़ा सकाळी सात वाजल्यापासून दहा ते पंधरा मिनिटे विलंबाने धावत होत्या. याबाबतची उद्घोषणा रेल्वेच्या सर्व स्थानकात होत होती. याचे कारण मात्र प्रवाशांना सांगितले जात नव्हते. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. कल्याण, डोंबिवलीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलही विलंबाने धावत असल्याने प्रवाशांचे हाल झाले. सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरू झालेला हा गोंधळ दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू होता. या गोंधळामुळे जलद आणि धिम्या लोकल गाडय़ांना सकाळच्या वेळी गर्दी झाली होती.
विविध स्थानकादरम्यान रुळांची कामे हाती घेण्यात आली आहेत. रुळांखालील जुनी झालेली खडी काढून नवीन खडी भरण्याचे काम सुरू आहे, तर काही ठिकाणी गंजलेले रुळही बदलण्यात येत आहेत. पहाटेपासून ही कामे हाती घेण्यात येतात, तसेच मध्यरात्रीही ती सुरुच असतात. यात घाटकोपर, विक्रोळी, भांडुप येथे लोकलसाठी प्रतितास २० ते ३० किलोमीटरची वेगमर्यादा घालण्यात आली आहे. त्यामुळे या भागातून जाताना लोकलचा वेग कमी होतो. परिणामी लोकलचे वेळापत्रकही विस्कळीत होत आहे. गेल्या चार दिवसांपासून रुळांची विविध कामे केली जात असून ती आणखी काही दिवस सुरू राहतील, असे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
वेगमर्यादा कुठे?
मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर सीएसएमटी ते कल्याण, खोपोली, कसारा, पनवेल, ठाणे ते वाशी, पनवेल या ट्रान्स हार्बरवर विविध कारणांसाठी काही ठिकाणी लोकल गाडय़ांसाठी वेगमर्यादा घालून देण्यात आली आहे. त्यामुळे येथून प्रतितास २० ते ४० किलोमीटरच्या वेगाने लोकल धावतात. आता रुळांच्या कामासाठीही वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ही कामे टप्प्याटप्यात हाती घेतली जात आहेत. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकावर काहीसा परिणाम होत आहे.
The post लोकलच्या वेगात ‘मर्यादे’चा अडसर ! appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3GMHPXc
via
No comments:
Post a Comment