|| संदीप आचार्य
मुंबईत ५३,८७७ क्षयरुग्णांचा शोध; ‘एमडीआर’ वाढीला अटकाव
मुंबई : करोनाकाळातही मुंबईत महापालिकेच्या आरोग्य विभागाने क्षयरोग निर्मूलनासाठी धडक मोहीम चालवत क्षयरोग प्रसाराला मोठ्या प्रमाणात अटकाव केला. करोनाकाळात २०२० मध्ये ४३,४६४ रुग्ण शोधण्यात आले तर २०२१ मध्ये ५३,८७७ क्षयरुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. वेळेत क्षयरुग्ण शोधण्याच्या पालिका आरोग्य विभागाच्या मोहिमेमुळे प्रतिरोधी क्षयरुग्ण (एमडीआर) वाढीला अटकाव करता आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील क्षयरोगाचे २०२५ पर्यंत निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याचा विचार करून मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने करोनाकाळातही मोठ्या प्रमाणात क्षयरुग्ण शोध आणि उपचार मोहीम राबविल्याचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. या मोहिमेअंतर्गत मागील दोन वर्षांत जवळपास एक लाख क्षयरुग्ण शोधण्यात आले असून प्रभावी उपचार करण्यासाठी काही अभिनव उपचार कल्पना राबविण्यात येत असल्याचे सुरेश काकाणी यांनी सांगितले.
पालिकेच्या क्षयरोग कार्यक्रमाच्या प्रमुख साहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. प्रणिता टिपरे म्हणाल्या की, क्षयरुग्ण शोधून वेळेत उपचार केल्यामुळे एमडीआर व एक्सडीआर क्षयरुग्णांच्या प्रसाराला अटकाव करणे शक्य होत आहे. मागील दोन वर्षांत मुंबईत एमडीआर क्षयाचे ९०१५ रुग्ण सापडले असून एक्सडीआर क्षयरुग्णांची संख्या सध्या ६०७ आहे. पालिकेचे दवाखाने व रुग्णालयांत क्षयरुग्णांवर उपचार करण्यात येत असून यासाठी आवश्यक असलेली चाचणी व्यवस्थाही पुरेशा प्रमाणात पालिकेकडे उपलब्ध आहे. तथापि वेगाने हा कार्यक्रम राबवण्यासाठी केंद्र सरकारकडे पन्नास कोटी रुपयांची मागणी करणार आहोत. सध्या पालिकेकडे उपलब्ध असलेल्या चाचणी उपकरणांद्वारे औषधांच्या रुग्णावरील परिणामांची माहिती मिळते तर हिंदुजा वा अन्य खासगी रुग्णालयातील चाचणी केंद्रात १४ औषधांच्या परिणामांची माहिती मिळते. प्रामुख्याने एमडीआर टीबी रुग्णांसाठी याची आवश्यकता असून या चाचणीसाठी येणारा साधारणपणे १२ हजार रुपयांचा खर्च रुग्णांना न परवडणारा असल्यामुळे काही स्वयंसेवी संस्था व व्यक्तींच्या मदतीमधून या चाचण्या करण्याचा प्रयत्न असतो. तथापि पालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात या खर्चाची तरतूद केली जाईल, असे डॉ. टिपरे यांनी सांगितले.
या वर्षी पालिकेच्या एच पश्चिम विभागात ११८३ क्षयरुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या क्षयरुग्ण शोधमोहिमेसाठी टेक महिंद्र अकादमीच्या पॅरामेडिकल विद्यार्थ्यांच्या माध्यमातून दत्तनगर झोपडपट्टीमध्ये ५४० घरांची तपासणी करण्यात आली, असे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उपालीमित्र वाघमारे यांनी सांगितले.
‘बीपाल’ औषधाचा वापर
क्षयरोग निर्मूलनासाठी ‘बीपाल’ या औषधाचा नव्याने चाचणी अंतर्गत वापर करण्यात येत आहे. बीपाल या नवीन उपचाराविषयी आयसीएमआरच्या सहकार्याने गोवंडीतील शताब्दी रुग्णालय आणि घाटकोपरमधील सर्वोदय रुग्णालय येथे अभ्यास सुरू आहे, असे सुरेश काकाणी यांनी सांगितले.
The post करोनाकाळातही पालिकेची क्षयरोग निर्मूलनासाठी धडक मोहीम appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3mlebR8
via
No comments:
Post a Comment