‘बेस्ट’चा २२३६ कोटी तुटीचा अर्थसंकल्प - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Monday, December 27, 2021

‘बेस्ट’चा २२३६ कोटी तुटीचा अर्थसंकल्प

सभागृहाच्या मंजुरीची प्रतीक्षा

मुंबई : बेस्ट उपक्रमाचा २०२२-२३ या आर्थिक वर्षांचा  दोन हजार २३६ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प  स्थायी समितीने मंजुरीसाठी सभागृहाकडे पाठवला आहे. शिलकीचा अर्थसंकल्प मांडण्याची पद्धत असताना गेल्या काही वर्षांपासून हजारो कोटी रुपयांचा तुटीचा अर्थसंकल्प मांडला जात आहे. ही तूट भरून काढण्यासाठी पालिका अनुदान देणार की नाही याचे उत्तर मिळालेले नसताना हा अर्थसंकल्प आता मंजूर करायचा की बेस्ट समितीकडे परत पाठवायचा याचा निर्णय आता सभागृहात होणार आहे.

बेस्टची आर्थिक तूट दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बेस्टचे चाक आर्थिक गाळात रुतले आहे.  २०२१-२२ या आर्थिक वर्षांत बेस्टचा तोटा एक हजार ६४१ कोटी रुपये एवढा होता. त्यात एका वर्षांत आणखी ५९५ कोटी रुपयांची वाढ झाली असून २०२०-२३ या आर्थिक वर्षांत ही तूट दोन हजार २३६ कोटी रुपयांवर गेली आहे. पालिकेने बेस्टला एक हजार ६४१ कोटी रुपयांचे अनुदान देण्याची मागणी बेस्ट समितीने केली आहे. या अर्थसंकल्पावर गेल्या आठवडय़ापासून स्थायी समितीमध्ये चर्चा सुरू होती. दीड तासाच्या चर्चेचा समारोप सोमवारी झाला. त्यानंतर या अर्थसंकल्पावर अहवाल मागवेपर्यंत निर्णय स्थगित ठेवण्याची घोषणा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली. मात्र नियमानुसार स्थायी समितीला केवळ हा अर्थसंकल्प पुढील निर्णयासाठी सभागृहाकडे पाठण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे अखेर बहुमताने अर्थसंकल्प मंजूर करीत सभागृहाकडे पाठवण्यात आला आहे.

फसवा अर्थसंकल्प

एक लाख शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्याची तरतूद कायद्यातच असताना बेस्टचा हजारो कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प हा बेकायदेशीर असल्याची टीका भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली. महापालिका अनुदान देणार या गृहीतकावर हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. बस ताफा वाढेल व त्यानंतर उत्पन्न वाढेल असे गृहीत धरण्यात आले आहे. मात्र अनुदानच मिळाले नाही तर बसताफा कसा वाढणार, उत्पन्न कसे वाढणार असे सवाल करीत हा अर्थसंकल्प फसवा व संभ्रम निर्माण करणारा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

विद्युत विभागातही तूट

आतापर्यंत नफ्यात असलेल्या विद्युत विभागातही तूट दाखवल्यामुळे सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. विद्युत विभाग नफ्यात असून त्याचा नफा परिवहन विभागासाठी वापरला जातो. मात्र या दोन विभागांचा खर्च व उत्पन्न वेगवेगळे दाखवले जाईल व ही तूट भविष्यात कमी होईल, असा विश्वास महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच येत्या काळात विद्युत यंत्रणेतील दोष ग्राहकांनी कळवण्याऐवजी नियंत्रण कक्षाला आधी कळेल व तातडीने दुरुस्त होईल, अशी यंत्रणा उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

काँग्रेसची टीका

बेस्ट उपक्रमाला तुटीची कीड लागल्याची टीका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली. बेस्टचे उत्पन्न १०० रुपये आणि खर्च १२५ रुपये अशी अवस्था असल्याचेही ते यावेळी म्हणाले. तर आस्थापना खर्चाचे प्रमाण १२० टक्क्यांवर गेल्यामुळे ही तूट वाढत गेल्याचीही टीका त्यांनी केली. १५०० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले होते, पण त्यापैकी ७५० कोटी अद्याप दिले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

The post ‘बेस्ट’चा २२३६ कोटी तुटीचा अर्थसंकल्प appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3z2H8GM
via

No comments:

Post Bottom Ad

Pages