मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा अमली पदार्थ नियंत्रण विभागातील (एनसीबी) कार्यकाळ संपला असून त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली नाही. ते एनसीबीमध्ये विशेष नियुक्तीवर कार्यरत होते. त्यामुळे प्रक्रियेचा भाग म्हणून आता ते पूर्वी कार्यरत असलेल्या महसूल गुप्तवार्ता संचालनालय (डीआरआय) येथे रुजू होतील. त्यानंतर त्यांच्या नव्या नियुक्तीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. एनसीबीमधील कार्यकाळ संपल्यामुळे आता वानखेडे दिल्ली डीआरआयमध्ये हजेरी लावतील. पण त्यांना नवी कुठली जबाबदारी मिळेल त्याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. वानखेडे यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबरला संपला होता. तसेच वानखेडे यांनीही तो वाढवण्याबाबत कोणतीही विनंती केली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास एनसीबीकडे आल्यानंतर समीर वानखेडे यांची सप्टेंबर २०२० मध्ये महसूल गुप्तचर संचालनालयातून एनसीबीमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर वानखेडे यांनी चित्रपटसृष्टीमध्ये अमली पदार्थ पुरवणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केली. वानखेडे यांना ऑगस्ट २०२१ पर्यंत संचालकपदी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर सप्टेंबरमध्ये पुन्हा एनसीबीने मुदतवाढीचा आदेश देऊन वानखेडे यांना ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत चार महिन्यांचा कार्यकाळ वाढवून दिला.
शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेनंतर समीर वानखेडे यांनी केलेल्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. वानखेडे यांना वैयक्तिक पातळीवरही लक्ष्य केले गेले. वानखेडे हे अनेकांना खोटय़ा प्रकरणात अडकवून त्यांच्याकडून खंडणीवसुली करत असल्याचाही गंभीर आरोप झाला. अखेर या प्रकरणी एनसीबी आणि मुंबई पोलिसांनी विशेष पथके स्थापन करुन या आरोपांची चौकशी सुरू केली आहे.
वानखेडेंचा एनसीबीमधील कार्यकाळ यापूर्वीच संपला होता. त्यांच्या सेवेत मुदतवाढ करण्याबाबत विचार सुरू होता. यामुळे निर्णय घेण्यास विलंब झाला होता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केला होता. वानखेडेंना एनसीबीमध्येच ठेवण्यासाठी भाजपमधील नेते प्रयत्न करत होते. यामुळेच वानखेडेंच्या बदलीबाबत निर्णय घेण्यास विलंब होत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.
The post वानखेडे पुन्हा ‘डीआरआय’मध्ये ; ‘एनसीबी’तील कार्यकाल संपुष्टात appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3mV6Msi
via
No comments:
Post a Comment