पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बीकेसीत मोहिमेस आरंभ
मुंबई : किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाला सोमवारी मुंबईतही सुरुवात झाली. वांद्रे-कुर्ला संकुल करोना आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्रात उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत या मोहिमेला सुरुवात झाली. या वेळी शास्त्रीनगर शाळेची दहावीतील विद्यार्थिनी तनुजा माकडवाला हिने पहिली लस घेतली. पहिली मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र आणि पुस्तक भेट देऊन पहिल्या दोन विद्यार्थ्यांचा सत्कार या वेळी करण्यात आला. करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेंतर्गत १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याची मोहीम सोमवारपासून मुंबईत सुरू झाली. तनुजा नंतर राजन हेमंत बारी या विद्यार्थ्यांने लस घेतली. पहिली मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र आणि पुस्तक भेट स्वरूपात प्रदान करून या दोन्ही विद्यार्थ्यांचा सत्कारदेखील याप्रसंगी करण्यात आला. संपूर्ण मुंबईत ४०० पेक्षा अधिक केंद्रांवर मिळून वेगाने लसीकरण करण्यात येत आहे. १५ ते १८ वर्षे वयोगटातील लसीकरणासाठी मुंबईत नऊ निर्देशित लसीकरण केंद्र निश्चित केली आहेत. या केंद्रांवर विद्यार्थ्यांना थेट येऊन नोंदणी करून लस घेता येईल. ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमांतून नोंदणीची सोय उपलब्ध असेल.
मुंबईत सुमारे ९ लाख किशोरवयीन मुलांना कोविड लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. १५ ते १८ या वयोगटाच्या लसीकरणास मान्यता मिळाल्याने या वयोगटातील प्रत्येक मुलाचे लसीकरण होणे आवश्यक आहे. कोविड लसीचे दोन्ही डोस ठरलेल्या मुदतीत घेऊन पाल्यांचे लसीकरण पूर्ण होईल, याकडे पालकांनीही लक्ष द्यावे, असे आवाहन या वेळी राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी उद्घाटनावेळी केले. कोविड विषाणूचा ओमायक्रॉन या नवीन प्रकाराचा वेगाने प्रसार होतो आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. मुखपट्टी योग्यरीत्या लावणे, हातांची नियमित स्वच्छता, सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचे प्रत्येकाने पालन करावे. घाबरून न जाता योग्य प्रकारे काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू शकते, असेही ठाकरे म्हणाले.
उद्घाटन प्रसंगी महापौर किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, स्थानिक आमदार झिशान सिद्दिकी, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, सहआयुक्त (दक्षता) अजित कुंभार, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, उपआयुक्त पराग मसूरकर, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, वांद्रे-कुर्ला संकूल कोविड आरोग्य केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे प्रत्यक्ष उपस्थित होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेने विक्रमी वेळेत एकूण १ कोटी ८० लाख कोविड मात्रा दिल्या असून यामध्ये पहिली मात्रा १०८ टक्के तर दुसरी मात्रा ८७ टक्के समाविष्ट आहे, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी या वेळी सांगितले.
प्रतिसाद पाहून केंद्रे वाढवणार बालकांच्या लसीकरणाला आतातरी प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात करण्यात आली असून सुरुवातीला केवळ नऊ केंद्रांवर हे लसीकरण होणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. या मोहिमेंतर्गत पालिकेच्या शाळांतील मुलांना केंद्रावर ने-आण करण्यासाठी वाहनाची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी शिक्षण विभागातील व वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांना समन्वय अधिकारी म्हणून नेमले आहे. तसेच पालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्रही घेण्यात आले आहे. याव्यतिरिक्त खासगी शाळांतील विद्यार्थी शाळेतून किंवा पालकांबरोबर आल्यास त्यांचीही नोंदणी करून त्यांना लस दिली जाणार आहे.
लशीनंतर सौम्य लक्षणे
२००७ वा त्यापूर्वी जन्म वर्ष असलेले विद्यार्थी लसीकरणासाठी पात्र राहतील. लसीकरणानंतर ताप येणे, हात दुखणे अशी सौम्य लक्षणे क्वचित प्रसंगी आढळून येऊ शकतात, अशा वेळी घाबरून न जाता वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधी घ्यावीत. त्याचप्रमाणे इतर काही त्रास उद्भवल्यास नजीकच्या महानगरपालिका रुग्णालयात संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
सध्या निवडलेल्या नऊ केंद्रांवर जागा उपलब्ध आहे, डॉक्टरांचे पथक आहे त्यामुळे काहीही अनुचित घडल्यास त्यावर नियंत्रण आणता येईल. चार-पाच दिवसांनी परिस्थिती पाहून मग खासगी शाळा तयार असतील तर शाळांमध्येही पथक पाठवून लसीकरण करण्याची आमची तयारी आहे.
– सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका
The post लसीकरणासाठी युवा वर्गात उत्साह appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3sUA5Pu
via
No comments:
Post a Comment