नवीन प्रशासकीय विभागनिर्मितीचा प्रस्ताव
मुंबई : मुंबईतील सर्वाधिक लोकसंख्येचा भाग असलेल्या पी उत्तर विभागाचे विभाजन गेल्या पाच-सहा वर्षांपासून रखडलेले असताना आता पालिका प्रशासनाने अंधेरी, जोगेश्वरीचा समावेश असलेल्या ‘के पूर्व’ या प्रशासकीय विभागाचे व कुर्ला, चुनाभट्टीचा भाग असलेल्या ‘एल’ या प्रशासकीय विभागाचे विभाजन करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे मुंबईत सध्या असलेल्या २४ प्रशासकीय विभागांत आणखी तीन विभागांची वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबईला नागरी सेवासुविधा देता याव्यात यासाठी पालिकेचे २४ प्रशासकीय विभाग करण्यात आले आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत उपनगरातील लोकसंख्या वेगाने वाढत गेल्यामुळे तेथील प्रशासकीय विभागांवरील ताण वाढू लागला आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक चांगल्या पद्धतीने सोयीसुविधा देण्यासाठी जास्त लोकसंख्येच्या विभाग कार्यालयांचे विभाजन करावे, अशी मागणी जोर धरू लागली होती. प्रभाग कार्यालयांचे विभाजन व पुनर्रचना यांचा अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या द्विसदस्यीय समितीने आपला अहवाल सादर केला असून आता अंधेरी, जोगेश्वरीचा भाग असलेल्या के पूर्व विभागाचे व कुर्ला, चुनाभट्टीचा भाग असलेल्या ‘एल’ विभागाचे विभाजन करावे अशी शिफारस केली आहे. तसा प्रस्तावही गटनेत्यांच्या बैठकीत ठेवण्यात आला आहे.
मालाडचे विभाजन रखडलेलेच
मालाड पूर्व आणि पश्चिमचा समावेश असलेला पी उत्तर हा विभाग मुंबईतील सर्वात जास्त लोकसंख्येचा भाग आहे. पूर्वेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापासून ते पश्चिमेला अरबी समुद्र उत्तरेला क्रांतीनगर आप्पा पाडा तर दक्षिणेला चिंचोली बंदरपर्यंत पसरलेल्या पी उत्तर विभागाचे विभाजन करण्याचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून गाजतो आहे. तब्बल १८ प्रभाग असलेल्या या भल्यामोठ्या विभागाला सोयीसुविधा देताना पालिका यंत्रणेच्याही नाकीनऊ येतात. नागरिकांनाही या विभाग कार्यालयापर्यंत येण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी या वर्षीच्या अर्थसंकल्पात या विभागाचे विभाजन करण्याची घोषणा केली होती. मालाड पूर्वेला ह्यपी पूर्वह्ण तर मालाड पश्चिमेला ह्यपी पश्चिमह्ण असे दोन विभाग करण्याचा पालिका प्रशासनाचा विचार आहे. त्यासाठी पाच कोटींची तरतूदही केली होती, मात्र हे विभाजन अद्याप होऊ शकले नाही.
कुर्ल्याचे विभाजन असे
कुल्र्याचा समावेश असलेल्या एल विभागात सध्या १५६ ते १७१ असे १६ प्रभाग आहेत. या विभागाची एकूण लोकसंख्या ८,९९,०४२ आहे. या विभागाचे एल दक्षिण व एल उत्तर असे दोन भाग करण्याची शिफारस करण्यात आली आहे. एल दक्षिणचे कार्यालय कुर्ला पश्चिमेकडे सध्या असलेल्या स. गो. बर्वे मार्गावरील कार्यालयात असेल, तर नव्याने स्थापन होणाऱ्या एल उत्तरचे कार्यालय चांदिवली येथील इमारत प्रस्ताव विभागाच्या इमारतीत स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
के पूर्वचे उत्तर-दक्षिण
विलेपार्ले, अंधेरी व जोगेश्वरी पूर्वेकडील काही भाग असलेल्या के पूर्व विभाग कार्यालयाचेही विभाजन प्रस्तावित आहे. या विभागात ७२ ते ८६ असे १५ प्रभाग आहेत. या विभागाची लोकसंख्या ८,२३,८८५ इतकी आहे. या विभागाचे के दक्षिण व के उत्तर असे दोन भाग करण्याचे प्रस्तावित आहे. सध्या असलेली के पूर्वची प्रशासकीय इमारत के दक्षिण विभाग कार्यालय म्हणून राहाणार आहे, तर के उत्तर विभागाच्या नवीन इमारतीसाठी जागेचा शोध सुरू आहे.
The post कुर्ला, अंधेरी पूर्वचे विभाजन?; नवीन प्रशासकीय विभागनिर्मितीचा प्रस्ताव appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3sYtKCG
via
No comments:
Post a Comment