ज्येष्ठ गायक-अभिनेते पंडित रामदास कामत यांचे निधन - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, January 8, 2022

ज्येष्ठ गायक-अभिनेते पंडित रामदास कामत यांचे निधन

मुंबई: रंगभूमीवरील सुवर्णयुगाचे साक्षीदार आणि ज्येष्ठ गायक – अभिनेते पंडित रामदास कामत यांचे शनिवारी रात्री ९.४५ वाजता विलेपार्ले येथील त्यांच्या निवासस्थानी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.  त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. कौस्तुभ कामत, सून, नातू असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंधेरी येथील पारसीवाडा स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

मराठी रंगभूमीवरील संगीत नाटकांच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार असलेले पंडित रामदास कामत हे मूळचे गोव्याचे. लहानपणीपासून वडिल बंधू उपेंद्र यांच्याकडून संगीताचे धडे गिरवणाऱ्या कामत यांनी नाट्यसंगीताचेही शिक्षण घेतले. पंडित गोविंद बुवा अग्नी, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित भीमसेन जोशी यांच्याबरोबरच प्रभाकर पेंढारकर आणि भालचंद्र पेंढारकर यांच्या हाताखाली त्यांनी नाट्यसंगीत आणि अभिनयाचे प्रशिक्षण घेतले होते. तर यशवंत देवांकडून त्यांनी भावगीत शिकून घेतले. संगीताचा गाढा अभ्यास केलेल्या पंडित रामदास कामत यांनी धि गोवा हिंदू असोसिएशनच्या ‘संगीत संशय कल्लोळ’ या नाटकाने आपल्या संगीत रंगभूमीवरील कारकिर्दीची सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी  ‘संगीत शारदा’, ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत मानापमान’, ‘संगीत मदनाची मंजिरी’, ‘संगीत एकच प्याला’, ‘संगीत मंदारमाला’, ‘संगीत होनाजी बाळा’ अशा जवळपास अठरा संगीत नाटकांमधून काम केले होते.

संगीत नाटक रंगभूमीवर बहरत असताना गोपीनाथ सावकार, मो. ग. रांगणेकर, मास्टर दत्ताराम, भालचंद्र पेंढारकर यांच्यासारख्या दिग्गजांच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी संगीत नाटक केले. ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’, ‘गोपीनाथ सावकार कलामंदिर’, ‘मुंबई मराठी नाट्यसंघ’, ‘रंगशारदा’, ‘भरत नाट्यमंदिर’, ‘मराठी रंगभूमी’ ते ‘चंद्रलेखा’ अशा विविध नाट्यसंस्थांबरोबर ते जोडले गेले होते. ‘गुंतता ह्रदय हे’, ‘नको विसरू संकेत मीलनाचा’, ‘तम निराशेचा सरला’ सारखी त्यांनी अनेक नाट्यपदे गाजली. त्यांनी गायलेली  ‘जन विजन झाले’, ‘अंबरातल्या निळ्या घनांची शपथ तुला आहे’, ‘श्रीरंगा कमला कांता’, ‘पूर्वेच्या देवा तुझे’, ‘देवा तुझा मी सोनार’ अशी कितीतरी गाणी आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. नोकरी सांभाळून तब्बल साठ वर्ष आपली सांगीतिक कारकिर्द मनापासून जपणाऱ्या रामदास कामत यांना २०१५ साली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते मानाच्या संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००९ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. शेवटपर्यंत संगीताची ओढ असणाऱ्या, त्याचा मनापासून अभ्यास करू इच्छिणाऱ्यांना संगीत शिकवण्याची आस त्यांच्या मनात होती. लहानपणी लागलेली संगीताची गोडी जपणारे, अभ्यास आणि रियाजाने आपल्यातील संगीतकला वाढवणारे रामदास कामत यांच्यासारखे संगीत रंगभूमीवरील तपस्वी रत्न आज हरपले आहे.

The post ज्येष्ठ गायक-अभिनेते पंडित रामदास कामत यांचे निधन appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3t6G2J1
via

No comments:

Post Bottom Ad

Pages