मुंबई : करोनाच्या तिसऱ्या लाटेतून पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील कर्मचारीही सुटू शकलेले नाहीत. आतापर्यंत ५०० हून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. यातील अनेकांना सौम्य, अतिसौम्य लक्षणे असल्याने बरे होण्याचे प्रमाणही अधिक असल्याचे सांगण्यात आले.
तिसऱ्या लाटेत करोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असून बाधित होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनाही करोनाचा संसर्ग मोठय़ा प्रमाणात होत आहे. मुंबईतील लोअर परळ, महालक्ष्मी कारखान्यांसह चर्चगेट येथील मुख्यालय, मुंबई सेन्ट्रल येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील कर्मचाऱ्यांचाही संख्या अधिक आहे. तीन दिवसांपूर्वी पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील करोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या ३५० हून अधिक होती. आता हीच संख्या ५०० हून जास्त झाली आहे. या वृत्ताला पश्चिम रेल्वेनेही दुजोरा दिला आहे. मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी रेल्वे कारखाने व अन्य कार्यालयांजवळ करोना चाचणीचे शिबीर मोठय़ा प्रमाणात लावण्यात आल्याचे सांगितले.
त्यात कर्मचाऱ्यांच्या चाचण्या केल्यानंतर अनेक जण बाधित आढळत असल्याचे म्हणाले. परंतु बहुतांश करोनाबाधित कर्मचाऱ्यांना सौम्य व अतिसौम्य लक्षणे असून उपचारानंतर ते बरेही झाल्याचे ठाकूर यांनी सांगितले. लक्षणांची तीव्रता अधिक असलेल्या कर्मचाऱ्यांनीही रेल्वे रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत.
जगजीवनराम रुग्णालयात उपचार
रेल्वे कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त असलेल्यांवर पश्चिम रेल्वेच्या जगजीवनराम रुग्णालयातही करोनावर उपचार होत आहेत. आतापर्यंत या रुग्णालयात ५३ जण उपचार घेत असून यामध्ये पश्चिम रेल्वेचा एक अधिकारी, १७ कर्मचारी, अन्य रुग्ण हे कर्मचाऱ्यांचे नातेवाईक, निवृत्त कर्मचारी व अन्य रेल्वेच्या विभागातील आहेत.
कारखान्यांना करोना विळखा कायम
पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ, महालक्ष्मी कारखान्यात करोनाबाधित कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढतेच आहे. आठवडय़ाभरात महालक्ष्मी कारखान्यातील १९१ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तर लोअर परळ कारखान्यातील कर्मचारीही बाधित होत आहेत. या कारखान्यांमध्ये करोना चाचणीचे शिबीर लावण्यात आले आहेत.
The post पश्चिम रेल्वेच्या ५०० कर्मचाऱ्यांना करोना appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3G9aw0F
via
No comments:
Post a Comment