परीक्षा मूल्यमापन केंद्रासाठी दिलेल्या रकमेचा हिशेब देण्यास टाळाटाळ
मुंबई : संलग्नता शुल्क न देणाऱ्या महाविद्यालयांचा मुद्दा मुंबई विद्यापीठात गेली अनेक वर्षे गाजत असताना आता विद्यापीठाने खर्चासाठी दिलेल्या रकमेचा हिशेबही देण्याची तसदी महाविद्यालयांनी घेतली नसल्याचे समोर आले आहे.
मूल्यमापन केंद्राच्या खर्चासाठी मुंबई विद्यापीठाने १८३ महाविद्यालयांना दिलेल्या चार कोटींच्या आगाऊ रकमेचा हिशोब महाविद्यालयांनी अद्याप विद्यापीठाला सादर केला नसल्याने उर्वरित रक्कम १८ टक्के व्याजाने परत घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
मुंबई विद्यापीठाने परीक्षा घेण्याची जबाबदारी विविध महाविद्यालयांवर सोपवली आहे. परीक्षा पूर्ण झाल्यानंतर उत्तरपत्रिका महत्त्वाच्या महाविद्यालयात म्हणजेच मूल्यमापन केंद्रात आणल्या जातात. तेथे जाऊन शिक्षक उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करतात. त्यासाठी लागणाऱ्या एकूण खर्चाचा अंदाज घेऊन विद्यापीठ महाविद्यालयांना काही रक्कम आगाऊ देते.
मूल्यमापनाचे काम झाल्यानंतर खर्चातून आलेली रक्कम वजा करून उर्वरित रक्कम महाविद्यालयांनी विद्यापीठाला परत करणे अनिवार्य असते. मात्र २०१२ ते २०१६ या कालावधीत अनेक महाविद्यालयांनी ही रक्कम विद्यापीठाला परत केलेली नाही. विद्यापीठाने १८३ महाविद्यालयांना चार कोटी २४ लाख ७५ हजार ४४६ रुपये वितरित केले होते.
या पैशांचा हिशेब मागण्यासाठी विद्यापीठाने अनेकदा पाठपुरावा केला. परंतु महाविद्यालयांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे येत्या १५ दिवसांत या रकमेचा हिशोब देऊन उर्वरित रक्कम १८ टक्के व्याजाने परत घेण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे.
विद्यापीठ या संदर्भात महाविद्यालयांना वारंवार सूचना देत आहे. काही महाविद्यालयांनी आगाऊ रकमेचा हिशेब दिलेला आहे. पण काही महाविद्यालयांनी मात्र तो दिलेला नाही. ज्या महाविद्यालयांनी तो दिलेला नाही त्यांनी येत्या पंधरा दिवसात तो विद्यापीठाला सादर करावा. सुधीर पुराणिक, कुलसचिव, मुंबई विद्यापीठ
The post विद्यापीठाचे चार कोटी महाविद्यालयांकडेच; परीक्षा मूल्यमापन केंद्रासाठी दिलेल्या रकमेचा हिशेब देण्यास टाळाटाळ appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3q1B1zD
via
No comments:
Post a Comment