करोनासंकट वाढल्यामुळे विक्रेते संकटात
मुंबई: मकरसंक्रांत म्हटली की घराघरातून दरवळणारा तिळाच्या लाडवांचा गंध, आसमंतात भिरभिरणारे निरनिराळय़ा आकाराचे रंगीबेरंगी पतंग आणि एकूणच उत्साहाचे वातावरण. पण गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही मकरसंक्रांतीवर करोनाची संक्रात आली आहे. करोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे डिसेंबरपासून निरनिराळय़ा आकाराच्या अन् रंगांच्या पतंगांनी सजलेली दुकाने पतंगप्रेमींच्या प्रतीक्षेत आहेत. मकरसंक्रांत अवघ्या तीन दिवसांवर आली असतानाही दुकानाकडे ग्राहक फिरकत नसल्यामुळे दुकानदार चिंतित झाले आहेत. करोना संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे यंदा मकरसंक्रांतीनिमित्त पतंगबाजी मोठय़ा प्रमाणावर होईल. त्यानिमित्ताने ग्राहक पतंग आणि मांजा खरेदीसाठी येतील या अपेक्षेने डोंगरी, वांद्रे, कुर्ला आदी ठिकाणच्या बाजारांतील घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांनी मोठय़ा प्रमाणावर विक्रीसाठी पतंग आणि मांजा आणला आहे. परंतु जानेवारीमध्ये रुग्णवाढीचा वेग वाढला आणि पतंग विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर काळजीची काजळी चढू लागली आहे.
या महिन्यात आत्तापर्यंत पतंगांची विक्री सरासरीपेक्षाही कमी आहे. आमच्याकडे पतंगांचा साठा भरपूर आहे. परंतु आता ग्राहकच येत नसल्याने करायचे काय हाच प्रश्न आमच्यासमोर आहे. दिवसा थोडय़ा फार प्रमाणात ग्राहक दुकानात येतात. पण रात्रीच्या संचारबंदीमुळे संध्याकाळी ग्राहक येईनासे झाले आहेत. मुंबईत पतंग तयार करणाऱ्या कारागिरांनी अधिक पैशांची मागणी केली. त्यांना इतके पैसे देणे परवडणारे नाही. त्यामुळे सुरत, बरेली, रामपूर, अहमदाबाद येथून पतंग मागवावे लागले. पतंगांते दरही काही प्रमाणात वाढवावे लागले आहेत, असे सांताक्रुझ येथील पतंग विक्रेते प्रशांत जाधव यांनी सांगितले.
पतंगांच्या किंमतीत वाढ
यंदा पतंगांच्या दरात वाढ झाली आहे. पतंगाला लावणाऱ्या काडय़ा, कागद आदींच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे यंदा पतंगांचे दरही वाढविण्यात आले आहेत. पतंगांचे दर साधारण ३ रूपयांपासून २० रुपयांपर्यंत आहेत. ‘‘महागाईमुळे ३ रुपयांचा पतंग ४ रुपयांना, १० रूपयांचा पतंग बारा रूपयांना, तर ६ रुपयांचे ८ रुपयांना विकण्यात येत आहेत, असे भायखळा येथील विक्रेते इमरान यांनी सांगितले. आत्तापर्यंत केवळ २० टक्के पतंगांची विक्री झाली आहे. ग्राहकांअभावी ८० टक्के पतंगाचा साठा दुकानात पडून आहे,’’, असे विक्रेत्यांनी सांगितले.
The post सलग दुसऱ्या वर्षी पतंग व्यवसायावर संक्रांत appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3zKN1bX
via
No comments:
Post a Comment