शैलजा तिवले, लोकसत्ता
मुंबई: ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होत असला तरी मुंबईसह राज्यात अजूनही डेल्टाचाही प्रादुर्भाव आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग सौम्य असला तरी डेल्टामुळे झालेला संसर्ग धोकादायकच आहे. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष न करता ५० वर्षांवरील व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
मुंबईत ४८ तासांत दोन करोनाबाधित पोलिसांच्या मृत्यूनंतर करोनाचा संसर्ग तीव्र होत आहे का, अशा शंकेचा सूर व्यक्त केला जात आहे. राज्यात ओमायक्रॉनमुळे रुग्णसंख्या वेगाने वाढत असली तरी डेल्टा अजून संपलेला नाही. काही रुग्णांमध्ये डेल्टाची लक्षणे प्रामुख्याने दिसत आहेत. त्यांना प्राणवायूची गरज लागत आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांमध्ये लसीकरण पूर्ण न झालेले किंवा एकच मात्रा घेतलेले आणि दीर्घकालीन आजार असलेल्यांचे प्रमाण अधिक आहे. आपल्याला प्रत्येक जीव महत्त्वाचा असून वाचवायचा आहे.त्यामुळे जोखमीच्या गटातील व्यक्तींना ओमायक्रॉन हा सौम्य असल्याचे मानून लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, असे मत करोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले.
रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये दाखल असणाऱ्या रुग्णांमध्ये डेल्टाबाधित रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. ओमायक्रॉनमुळे बाधित झालेले रुग्ण लगेचच बरे होऊन घरी परतत आहेत, अशी माहिती कृती दलाचे सदस्य डॉ. केदार तोरस्कर यांनी दिली. रुग्णालयात काही रुग्णांमध्ये अजूनही रक्तामध्ये गुठळय़ा निर्माण झाल्यामुळे हृद्यविकाराचा झटका येणे, फुप्फुसांवर परिणाम होणे असे रुग्ण आढळत आहेत. त्यांचे प्रमाण तुलनेने फार कमी असले तरी रुग्ण येत आहेत. त्यामुळे ५० वर्षांवरील आणि इतर दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांनी बाधित झाल्यास लक्षणांवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असे मत डॉ. राहुल पंडित यांनी व्यक्त केले. रुग्णालयात दाखल झालेल्यांमध्ये ५० वर्षांवरील व्यक्तींचा समावेश अधिक आहे. या रुग्णांमध्ये लक्षणे काही प्रमाणात तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रुग्णांनी गृहविलगीकरणात असतानाही वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार करावेत, असे मत लीलावती रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचे प्रमख डम्ॉ. जलील पारकर यांनी सांगितले.
सात टक्के रुग्णांची प्रकृती गंभीर
राज्यभरात रुग्णालयात दाखल असलेल्या २२ हजार ६०२ रुग्णांपैकी सुमारे १५ टक्के म्हणजेच ३ हजार ५१९ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत. यातील सुमारे सात टक्के म्हणजेच १५७० रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालयातील सुमारे ७८ टक्के रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत.
The post डेल्टाचा प्रादुर्भाव कायम ; ५० वर्षांवरील रुग्णांनी लक्षणांकडे लक्ष देणे गरजेचे; तज्ज्ञांचे मत appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3qarZAm
via
No comments:
Post a Comment