अधिक पारदर्शकता, कठोर अंमलबजावणीसाठी चाचपणी
इंद्रायणी नार्वेकर
मुंबई : विनामुखपट्टय़ा फिरणाऱ्या नागरिकांकडून ऑनलाइन पद्धतीने दंडवसुली करण्याबाबत पालिका प्रशासन चाचपणी करीत आहे. अनेकदा पैसे नाही, असे सांगून निसटू पाहणारे नागरिक आणि दंडाच्या नावाखाली पैसे उकळणारे खोटे क्लीन अप मार्शल यांना आळा घालण्यासाठी घनकचरा विभाग ऑनलाइन पद्धतीने दंडवसुलीचा विचार करत आहे. करोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे पुन्हा एकदा विनामुखपट्टी फिरणाऱ्या नागरिकांविरोधातील कारवाई कडक करण्यात आली आहे. मुखपट्टी न लावणाऱ्यांकडून कायद्यानुसार २०० रुपये दंड वसूल केला जात आहे. या दंडवसुलीसाठी पालिकेने मुंबईत ठिकठिकाणी क्लीन अप मार्शलच्या नेमणुकाही केल्या आहेत. मात्र हे क्लीन अप मार्शल म्हणजे पालिकेसाठी रोगापेक्षा इलाज भयंकर ठरू लागले आहेत. क्लीन अप मार्शल आणि नागरिक यांच्यातील तंटे हे नेहमीचेच झाले आहेत, तर काही वेळा खोटे क्लीन अप मार्शल नागरिकांकडून पैसे उकळत असल्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. कधी नागरिकही दंडाची रक्कम भरण्यासाठी पैसे नसल्याचे सांगून कारवाईतून निसटू पाहतात. या सगळय़ा गोंधळावर पालिकेने आता ई-पेमेंटच्या माध्यमातून दंड घेण्याचा पर्याय शोधला आहे. दंडवसुलीसाठी मोबाइल अॅप किंवा तत्सम यंत्रणा तयार करण्यासाठी घन कचरा विभागाने पालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाची मदत घेण्याचे ठरवले असून संबंधित विभागाला तसे कळवण्यात आल्याचे घन कचरा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
बहुतांशी नागरिक विविध अॅप्सच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करत असतात. त्यामुळे अनेकदा त्यांच्या खिशात रोख रक्कम नसते. त्यामुळे ऑनलाइन दंडवसुलीच्या पर्यायाचा विचार करण्यात येत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी मुंबईत क्लीन अप मार्शलने एका प्रसिद्ध मोबाइल अॅपद्वारे पैसे घेतल्याचे प्रकरण समाजमाध्यमांवर चर्चेत होते. असे प्रकार पुन्हा घडू नयेत, कोणा एका व्यक्तीच्या खात्यावर दंड भरण्यापेक्षा त्याकरिता पालिकेकडे पैसे जमा होतील अशी यंत्रणा हवी म्हणून यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाची मदत घेत आहोत असे घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, दंडवसुलीसाठी नक्की कोणती यंत्रणा किंवा अॅप तयार करता येईल, ते कसे काम करणारे असेल यावर आम्ही कार्यवाही करीत असून लवकरच त्यातून काही निष्पन्न होईल, अशी माहिती माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख शरद उघडे यांनी दिली.
The post नियम मोडणाऱ्यांकडून ऑनलाइन दंडवसुली? appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3n6HAz4
via
No comments:
Post a Comment