पत्राचाळीच्या पुनर्विकासाला २६ जानेवारीपासून सुरुवात
मुंबई : गोरेगाव, पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील इमारतीच्या कामाला अखेर २६ जानेवारीपासून म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून सुरुवात होणार आहे. अर्धवट असलेले पुनर्विकसित इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरू करण्याकरिता कंत्राटदार नेमण्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून २६ जानेवारीच्या मुहूर्तावर बांधकामास सुरुवात करण्यात येणार असल्याचे शुक्रवारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केले. पत्राचाळीतील ६७२ मूळ रहिवाशांची घराची तेरा वर्षांची प्रतीक्षा आता अखेर संपली आहे.
सिद्धार्थ नगर अर्थात पत्राचाळ म्हाडा वसाहतीचा पुनर्विकास २००८ मध्ये एका खासगी विकासकाला देण्यात आला. त्यानुसार विकासकाने रहिवाशांना भाडे देऊन स्थलांतरित केले आणि इमारती पाडल्या. पुनर्विकासास सुरुवात केली. मात्र पुनर्विकास अत्यंत संथगतीने सुरू होता. त्यातच या प्रकल्पात विकासकाने मुंबई मंडळाची मोठी आर्थिक फसवणूक केल्याची बाब २०१२-१३ मध्ये मंडळाच्या तपासणीत उघड झाली. विकासकाने हा प्रकल्प परस्पर अनेकांना विकल्याची आणि मूळ ६७२ रहिवाशांना बेघर केल्याचेही समोर आले. पुनर्विकसित आणि मंडळाच्या हिश्यातील घरांचे कामही बंद केले. एकूणच या सर्व गोष्टींची गंभीर दखल घेऊन राज्य सरकारने विकासकाविरोधात गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई केली. तर दुसरीकडे ५ एप्रिल २०१८ ला त्याच्याकडून प्रकल्प काढून घेत म्हाडाच्या ताब्यात दिला.
प्रकल्प ताब्यात येऊन तीन वर्षे होऊन गेली तरी बंद काम काही पुन्हा सुरू झालेले नाही. मात्र, आता पुनर्वसित इमारतीचे अपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यासाठी रेलकॉन इन्फ्राप्रोजेक्टस आणि अहलुवालिया काँट्रॅक्टर्स या दोन कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. या निविदांची छाननी पूर्ण झाली असून यातील एका कंपनीची अंतिमत: निवड करण्यात आली आहे. सरकारची मंजुरी मिळाल्यास कंत्राटदाराचे नाव जाहीर करून त्वरित कार्यादेश देण्यात येणार असल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
सोडतीसाठी अंदाजे २४०० घरे उपलब्ध होणार
पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाला २७०० घरे सोडतीसाठी उपलब्ध होणार आहेत. मात्र या घरांचे कामही विकासकाने बंद केले. त्यामुळे ही घरेही रखडली आहेत. अशात २०१६ मध्ये बंद झालेल्या या प्रकल्पातील अपूर्ण ३०६ घरांसाठी मंडळाने सोडत काढली. पण घरे अपूर्ण असल्याने या घरांचा ताबा मिळण्याची प्रतीक्षा विजेत्यांना आहे. या विजेत्यांचीही घरांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कारण म्हाडाच्या हिश्यातील अपूर्ण इमारतीचे काम पूर्ण करण्यासाठीही काही दिवसांपूर्वीच मंडळाने निविदा काढली आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत सोडतीसाठी अंदाजे २४०० घरे उपलब्ध होणार असून ३०० जणांना घराचा ताबा मिळणार आहे.
दोन वर्षांत हक्काच्या घरात
२००८ पासून ६७२ रहिवासी बेघर आहेत. तर मागील ५ वर्षांपासून त्यांना भाडे ही मिळालेले नाही. स्वखर्चाने हे रहिवासी भाडय़ाच्या घरात राहत असून अनेकजण आर्थिक अडचणीत आहेत. पण आता मात्र या रहिवाशांना लवकरच हक्काचे घर मिळणार आहे. निविदेनुसार काम सुरू झाल्यापासून दोन वर्षांत काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षांत हे रहिवासी हक्काच्या घरात जातील असा दावा मंडळाने केला आहे.
१३ वर्षांचा आमचा वनवास आता अखेर संपणार आहे. आमच्या इमारतीच्या कामाला सुरुवात होणार असून ही आमच्यासाठी खूप मोठी दिलासादायक बाब आहे. आता कामाला सुरुवात होईल आणि आम्हाला हक्काचे घर मिळेल ही बाब महत्त्वाची आहे. त्यासाठीच आम्ही संघर्ष केला. मात्र मागील पाच वर्षांपासून आम्हाला भाडे मिळालेले नसून लाखोंची भाडे थकबाकी आहे. त्यामुळे सरकारने थकबाकीचा प्रश्न निकाली काढावा. तसेच म्हाडाने जाहीर केल्याप्रमाणे काम सुरू झाल्यापासून घराचा ताबा मिळेपर्यंतचे भाडे द्यावे हीच आता आमची मुख्य मागणी आहे.
मकरंद परब, सचिव, पत्राचाळ संघर्ष समिती
The post तेरा वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3f3s5DI
via
No comments:
Post a Comment