भाडे दंडासहीत वसूल करण्याचा निर्णय, अंदाजे तीन कोटींची रक्कम थकीत
निलेश अडसूळ
मुंबई : विद्यापीठातून निवृत्त होऊनही विद्यापीठाचे निवासस्थान रिकामे न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता दंडासहीत घरभाडे द्यावे लागणार आहे. अशा नऊ कर्मचाऱ्यांचा अहवाल नुकताच व्यवस्थापन परिषदेसमोर सादर झाला असून या कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाचे लाखो रुपयांचे भाडे थकवल्याचे उघड झाले आहे. हे भाडे दंडासहीत वसूल करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतल्याने वर्षांनुवर्षे विद्यापीठाच्या घरात पाय पसरलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांना चांगलाच भुर्दंड बसणार आहे. विद्यापीठात शिकवणारे प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांसाठी काही घरांची तरतूद विद्यापीठ संकुलात आहे. यामध्ये काही बंगले तर काही सदनिका आहेत. ही घरे निवृत्तीनंतर तीन महिन्यांत रिकामी करणे अनिवार्य असते. परंतु काही कर्मचारी या नियमाचे उल्लंघन करून निवृत्तीनंतर वर्षांनुवर्षे विद्यापीठाच्याच घरात राहतात. परिणामी सेवेत कार्यरत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांना विद्यापीठाबाहेर राहावे लागल्याने त्यांची गैरसोय होते. अशा अनेक तक्रारी विद्यापीठ प्रशासनाकडे वारंवार येत असल्याने विद्यापीठाने अखेर कारवाई सुरू केली आहे.
विद्यापीठाने व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अॅड. नील हेळेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. या समितीने नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सहा प्राध्यापक आणि तीन कर्मचारी यांच्या निवृत्तीनंतरच्या थकीत भाडय़ाचा अहवाल सादर करून ते दंडसहीत वसूल करण्यास मंजुरी दिली. ही रक्कम अंदाजे ३ कोटी रुपये आहे. यापैकी अनेकांनी विद्यापीठाची निवासस्थाने सध्या रिकामी केली असली तरी निवृत्तीनंतर वापर केलेल्या कालावधीचे भाडे घेण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त कार्यकाळ संपूनही विद्यापीठ निवासात कोणी राहत असेल तर त्यांचाही शोध घेऊन कारवाई केली जाणार आहे.
होतेय काय?
विद्यापीठातील प्राध्यापक किंवा कर्मचारी सेवेत असेपर्यंत विद्यापीठातील राहत्या घराची भाडे रक्कम त्यांच्या पगारातून वजा केली जाते. परंतु काही कर्मचारी निवृत्तीनंतरही या घरांमध्ये राहतात. काही कर्मचाऱ्यांचे निधन झाल्याने त्यांचे कुटुंबीय या घरांमध्ये राहतात. निवृत्तीनंतर हे भाडे वेतनातून मिळणे बंद झाल्याने प्रत्यक्ष वसुलीशिवाय विद्यापीठाकडे कोणताही पर्याय नाही. शिवाय ज्या कर्मचाऱ्यांचे थकीत भाडे १० ते ५० लाख किंवा त्याहून अधिक रकमेचे आहे त्यांची वसुली कधी आणि कशी होणार असाही प्रश्नही उपस्थित झाला आहे.
कर्मचारी निवृत्त होण्यापूर्वी त्यांना पूर्वसूचना दिली जाते. त्यानंतर घर रिकामे न केल्यास तशी नोटीस विद्यापीठ देते. हा कालावधी वाढत गेल्यास राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे घराच्या क्षेत्रफळानुसार आपण दंड आकारतो. काही कर्मचाऱ्यांकडून, आमच्याकडे दुसरे घर नाही अशी कारणे पुढे येतात. परंतु नियमानुसार त्यांना घर सोडावेच लागेल. तशी कारवाई आम्ही सुरू केली आहे.
– अॅड. नील हेळेकर, व्यवस्थापन परिषद सदस्य
The post निवृत्तीनंतरही नऊ कर्मचाऱ्यांचा विद्यापीठातच मुक्काम appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3EZjYT2
via
No comments:
Post a Comment