विमानतळावरील करोना चाचण्यांबाबत महापालिका प्रशासनाचे स्पष्टीकरण
मुंबई : मुंबई विमानतळावर करण्यात येणाऱ्या करोना चाचण्या आणि विलगीकरण प्रक्रिया हा पैसे उकळण्याचा प्रकार असल्याचा आरोप भारतीय वंशाच्या एका ब्रिटिश नागरिकाने केला होता. त्याबतची ध्वनिचित्रफीतही समाजमाध्यामांवर फिरते आहे. मात्र विमानतळावर होत असलेल्या चाचण्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच होत असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३० डिसेंबर २०२१ रोजी लंडन येथून आलेल्या प्रवाशाने विमानतळावरील करोना चाचण्यांबाबत आरोप केल्याची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर फिरते आहे. मनोज लाडवा असे त्यांचे नाव असून ते त्यांच्या पत्नीसह नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी भारतात आले होते. विमानप्रवासापूर्वी लंडनमध्ये केलेल्या चाचणीत ते बाधित आढळले नव्हते. मात्र मुंबई विमानतळावर केलेल्या चाचणीत ते बाधित आढळले. त्यानंतर त्यांची रवानगी थेट सरकारी विलगीकरण केंद्रात करण्यात आली. त्यामुळे त्यांना अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे त्यांनी विमानतळावरील चाचण्या व विलगीकरण प्रक्रियेवर आरोप केले होते. मात्र या व्यक्तीने केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत, असे स्पष्टीकरण पालिका प्रशासनाने दिले आहे.
लाडवा यांनी दिलेल्या स्वयम् घोषणापत्रानुसार व त्यांनीच निवडलेल्या करोना चाचणीच्या पर्यायानुसार महानगरपालिकेद्वारे कार्यवाही करण्यात आली आहे. इंग्लंड (ग्रेट ब्रिटन) या देशासह जोखमीच्या देशातून आलेल्या प्रवाशांबाबत केंद्र व राज्य शासनाच्या आदेशांनुसार आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसारच कार्यवाही करण्यात आली आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. जोखमीच्या देशांमधून आलेल्या प्रवाशांना करोना चाचणी करणे बंधनकारक आहे. आलेल्या प्रत्येक प्रवाशाला ‘रॅपिड आरटीपीसीआर’ व ‘नियमित आरटीपीसीआर’ अशा २ प्रकारच्या चाचण्यांपैकी कोणतीही एक चाचणी करण्याचा पर्याय देण्यात येतो. यापैकी रॅपिड चाचणीचा अहवाल हा साधारणपणे अर्ध्या तासात उपलब्ध होतो. तर नियमित चाचणीचा अहवाल हा साधारणपणे ७ ते ८ तासांनी उपलब्ध होतो. या २ चाचण्यांपैकी कोणत्या प्रकारची चाचणी करावी, याबाबतचा निर्णय संपूर्णपणे प्रवाशाचा असतो.
या प्रवाशाने प्रवासापूर्वी घोषणापत्र भरले होते. यामध्ये केंद्र व राज्य शासनाद्वारे देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे व आदेशांचे ते परिपूर्ण पालन करणार असल्याचे त्यांनी नमूद केले होते. तसेच कोविड चाचणी करण्याबाबत देखील रॅपिड आरटीपीसीआर चाचणी करण्याचा निर्णय देखील सर्वस्वी त्यांचाच होता. ज्यानुसार त्यांची रॅपिड चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये त्यांना कोविड बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. तसेच त्या दिवशी सुमारे १ हजार प्रवाशांच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या. ज्यापैकी १५ प्रवाशांना कोविड बाधा झाली असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता, असेही प्रशासनाचे म्हणणे आहे.
प्रवासात बाधेची शक्यता विमान सुटण्याच्या नियोजित वेळेच्या ७२ तास आधी कोविड चाचणी केली होती. सुमारे ७२ तासांचा कालावधी आणि विमान प्रवासाचाही कालावधी लक्षात घेता, विमान प्रवासानंतर करण्यात आलेल्या कोविड चाचणीचा अहवाल हा ‘बाधित’ येऊ शकतो. याअनुषंगाने हेही नमूद करण्यात येत आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात करण्यात येत असलेल्या करोना चाचण्यांसाठी मान्यताप्राप्त चाचणी संच उपयोगात आणले जातात. तसेच या चाचण्या पात्र तंत्रज्ञांद्वारेच करण्यात येतात, असेही प्रशासनाने म्हटले आहे.
…तर अहवाल बाधित
७२ तासांचा कालावधी आणि विमान प्रवासाचाही कालावधी लक्षात घेता, विमान प्रवासानंतर करण्यात आलेल्या कोविड चाचणीचा अहवाल हा ‘बाधित’ येऊ शकतो. याअनुषंगाने पालिकेने नमूद केले, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात करण्यात येत असलेल्या करोना चाचण्यांसाठी मान्यताप्राप्त चाचणी संच उपयोगात आणले जातात.
The post चाचण्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच; विमानतळावरील करोना चाचण्यांबाबत महापालिका प्रशासनाचे स्पष्टीकरण appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3ERI6qI
via
No comments:
Post a Comment