विनोदाचा गारुडी… - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 2, 2021

विनोदाचा गारुडी…

अल्पचरित्र : निखळ विनोदशैलीचे प्रतिभासंपन्न लेखक असेच प्रा. द. मा. मिरासदार यांचे वर्णन करावे लागेल. त्यांच्या विनोदी कथांनी वाचकांच्या मनावर गारुड निर्माण केले. द. मा. मिरासदार, शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळकर या तिघांनी  कथाकथनाद्वारे केवळ महाराष्ट्रच नाही तर देशात आणि परदेशामध्येही रसिकांना जिंकून घेतले होते.

अकलूज येथे १४ एप्रिल १९२७ रोजी मिरासदार यांचा जन्म झाला होता. अकलूज आणि पंढरपूर येथे शिक्षण घेतल्यानंतर ते पुण्यात आले. एम.ए. पदवी संपादन केल्यावर काही काळ त्यांनी पत्रकारिता केली. कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत शिक्षक म्हणून १९५२ मध्ये ते अध्यापन क्षेत्रात आले. १९६१ मध्ये ते मराठीचे प्राध्यापक झाले. १९६८ ते १९८९ या कालखंडात गरवारे वाणिज्य महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.

१९५० मध्ये ‘सत्यकथा’ मासिकात प्रसिद्ध झालेल्या ‘रानमाणूस’ या कथेपासून त्यांच्या लेखन कारकीर्दीचा श्रीगणेशा झाला.

व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार या तिघांनी १९६२ पासून महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागात कथाकथनाचा कार्यœ म सादर करण्यास सुरुवात केली. एकत्रित कथाकथनाचे त्यांनी तीन हजारांहून अधिक कार्यक्रम  केले.  कॅनडा आणि अमेरिकेमध्ये २५ कार्यक्रमांचा विक्रमही त्यांनी केला होता.

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, चिं. वि. जोशी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे यांनी जोपासलेल्या विनोदी लेखन परंपरेमध्ये मिरासदार यांनी आपली नाममुद्रा उमटवली होती.

मिरासदार यांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा या ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद अधोरेखित करणाऱ्या आहेत. मात्र, ‘स्पर्श’, ‘विरंगुळा’, ‘कोणे एके काळी’ सारख्या काही गंभीर कथांतून त्यांनी जीवनातील कारुण्यही प्रत्ययकारीपणे टिपले आहे. तरीही त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती मिश्कील कथा लिहिण्याकडेच आहे. १९९८ मध्ये परळी-वैजनाथ येथे झालेल्या ७१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. त्यानंतर एका तपाने पुण्यात झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ८३ वर्षांच्या मिरासदार यांनी ‘भुताची गोष्ट’ ऐकवली होती. दीड तासाहून अधिक काळ रंगलेल्या या गोष्टीने अवघा मंडप हास्यकल्लोळात बुडून गेला होता.

द. मा. मिरासदार यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झाले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी योगदान दिले होते.  युती सरकारच्या काळात त्यांनी राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्षपद भूषविले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

पंढरपूरशी बंध

प्रा. द. मा. मिरासदार यांचे पंढरपूरशी अनोखे बंध होते. त्यांचे शालेय शिक्षण लोकमान्य विद्यालयात झाले. पंढरपूर येथील नागरिकांचे राहणीमान, वारी मधील अनेक प्रसंग त्यांनी लेखन आणि कथाकथनातून मांडले.  पंढरपूर येथील कवठेकर प्रशाला येथे शिक्षक म्हणून त्यांनी काम केले होते. याच कालखंडात त्यांनी विनोदी साहित्य लेखन सुरू केले.  विशेष करून पंढरपूर येथील नागरिकांच्या फळीवरच्या गप्पा, चिरमुरे, वारीमधील लगबग अशा प्रसंगातून पंढरपूरच्या आठवणी वेगळ्या पद्धतीने मांडल्या.

गाजलेल्या साहित्यकृती…

‘व्यंकूची शिकवणी’, ‘माझ्या बापाची पेंड’, ‘भुताचा जन्म’, ‘माझी पहिली चोरी’, ‘हरवल्याचा शोध’ या त्यांच्या कथा उत्कृष्ट लेखन आणि उत्तम सादरीकरणामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनावर कोरल्या गेल्या आहेत. ‘गप्पागोष्टी’, ‘गुदगुल्या’, ‘मिरासदारी’, ‘गप्पांगण’, ‘ताजवा’ असे त्यांचे २४ कथासंग्रह आहेत. ‘एक डाव भुताचा’ या चित्रपटाच्या कथा-पटकथा लेखनासह त्यांनी हेडमास्तरची भूमिकाही साकारली होती. ‘एक डाव भुताचा’ आणि ‘ठकास महाठक’ या दोन चित्रपटांच्या संवादलेखनाबद्दल त्यांना पारितोषिके मिळाली होती. व्यंकूची शिकवणी’ या त्यांच्या विनोदी कथेवरून ‘गुरुकृपा’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली.

The post विनोदाचा गारुडी… appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3F4X0Ls
via

No comments:

Post Bottom Ad

Pages