दोन लाख ४६ हजार ६५ अर्ज
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ८ हजार ९८४ घरांसाठीच्या सोडतीची नोंदणी, अर्ज विक्री-अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया संपली असून सोडतीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तब्बल २ लाख ४६ हजार ६५ अर्ज सादर झाले आहेत. म्हणजेच एका घरासाठी सरासरी २७ अर्ज सादर झाले असून कोकण मंडळाच्या सोडतीतील घरासाठी आजपर्यंत सादर झालेल्या अर्जाचा हा विक्रमी आकडा आहे.
तीन वर्षांनंतर कोकण मंडळाची सोडत जाहीर झाली आहे. त्यानुसार ८,९८४ घरांसाठीची मागील माहिन्याभरापासून सुरू असलेली सोडतपूर्व प्रक्रिया शुक्रवारी संपली आहे. या सोडतीत सहभागी होत परवडणाऱ्या दरात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोंदणीच्या अखेरच्या दिवसापर्यंत एक लाख ८२ हजार ५२३ इच्छुकांनी नोंदणी केली. तर दोन लाख ७८ हजार २२६ जणांनी अर्ज भरले असून यातील दोन लाख ४६ हजार ६५ जणांनी अनामत रक्कमेसह बँकेकडे अर्ज दाखल केले. ३२ हजार ११९ जणांनी अर्ज भरले पण अनामत रक्कम भरत अर्ज बँकेकडे जमा न केल्याने हे अर्जदार सोडतीत सहभागी होणार नाहीत.
आता सोडतपूर्व प्रक्रिया संपली असल्याने कोकण मंडळाकडून अर्जांची छाननी करत ६ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर अर्जदारांना ७ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजेपर्यंत सूचना-हरकती सादर करत येणार असून ८ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता सोडतीत सहभागी होणाऱ्या अर्जदारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. या यादीतील अर्जदार १४ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता ठाण्यात होणाऱ्या सोडतीत सहभागी होतील आणि त्यानंतर कुणाच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होते हे त्यावेळी समजेल.
कोकण मंडळाच्या सोडतीतील घरे म्हणजे मुंबईजवळ, मुंबई महानगर प्रदेशात असल्याने आणि खासगी गृहप्रकल्पातील घरांपेक्षा कमी किमतीतील घरे असल्याने सोडतीला नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो. पण यावेळी मिळालेला प्रतिसाद हा आजवरचा सर्वाधिक मोठा प्रतिसाद आहे. याआधीच्या २०१८ च्या सोडती ९,०१८ घरांसाठी केवळ ५५ हजार अर्जदार सहभागी झाले होते. म्हणजेच त्यावेळी एका घरासाठी केवळ सरासरी सहा अर्ज सादर झाले होते. यावेळी मात्र एका घरामागे सरासरी २७ अर्ज सादर झाले आहेत. तर अर्जाचा आकडा पहिल्यांदाच दोन लाखांच्या वर गेला आहे.
The post म्हाडाच्या घरांसाठी विक्रमी प्रतिसाद appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3D8k3TM
via
No comments:
Post a Comment