चित्रफीत दाखवत नवाब मलिक यांचा आरोप
मुंबई :क्रूझवरील अमली पदार्थ प्रकरणात १३०० लोकांमधून ११ जणांना एनसीबीने ताब्यात घेतले होते. मात्र भाजपचे नेते मोहित कंभोज यांचा मेहुणा रिषभ सचदेवा याच्यासह तीन जणांना सोडून देण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत त्याबाबतची चित्रफीत दाखवत केला. तसेच या तिघांना का आणि कोणाच्या सांगण्यावरून सोडून दिले, असा सवालही मलिक यांनी केला.
नवाब मलिक यांनी दोन दिवसांपूर्वी एनसीबीच्या छाप्यात भाजपशी संबंधित व्यक्ती होत्या याची चित्रफीत दाखवली होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा पत्रकार परिषद घेत भाजपचा या छाप्यांशी संबंध असल्याचा आरोप केला. तसेच रिषभ सचदेवा, प्रतीक गाभा, अमीर फर्निचरवाला या तिघांना ताब्यात घेतानाची आणि काही काळाने त्यांच्या नातेवाईकांसोबत एनसीबीच्या कार्यालयातून बाहेर पडतानाची चित्रफीत नवाब मलिक यांनी दाखविली.
क्रूझवर १३०० लोकांवर छापा टाकण्यात आला. हे छापासत्र १२ तास सुरू होते. त्यातून ११ लोकांना ताब्यात घेऊन एनसीबीच्या कार्यालयात आणले होते. परंतु त्यानंतर रिषभ सचदेव व इतर दोघांना सोडण्याचा आदेश भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी दिल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी या वेळी केला.
एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांनी ‘त्या’ तिघांना का सोडले आणि कुणाच्या सांगण्यावरून सोडले याचे उत्तर द्यावे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली.
रिषभ सचदेवा याला बाहेर सोडताना त्याचे वडील आणि काका सोबत होते. या तीन व्यक्तींचे नातेवाईक एनसीबीच्या कार्यालयात आले कसे, असा सवाल करत रिषभ सचदेवाचे वडील आणि काका व समीर वानखेडे यांच्या संभाषणाचे तपशील मुंबई पोलिसांनी तपासल्यास संपूर्ण सत्य बाहेर येईल असेही नवाब मलिक म्हणाले. हे सगळं न्यायालयात सिद्ध होईलच, परंतु जनतेच्या न्यायालयातही आले पाहिजे म्हणून हे प्रकरण मांडल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
क्रूझच्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, त्यातील चित्रण तपासले तर अनेक गोष्टी उघड होतील. हे प्रकरण गंभीर असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यामध्ये लक्ष द्यावे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली.
प्रवीण दरेकर यांचे प्रत्युत्तर… अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांचे आरोप बिनबुडाचे असून सनसनाटी निर्माण करून कोणाला तरी वाचविण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे प्रत्युत्तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिले आहे. सीबीआय, ईडी, एनआयए, एनसीबी या देशातील उत्तम तपास यंत्रणा आहेत. पण नवाब मलिक यांना या तपास यंत्रणापेक्षा जास्त ज्ञान असेल व कायद्याची माहिती असेल तर त्यांनी आपल्याकडील माहिती कायद्याच्या चौकटीत सांगावी, असे दरेकर यांनी स्पष्ट केले. राज्याचे गृहमंत्री तुमच्याच पक्षाचे आहेत. त्यामुळे मुंबई व महाराष्ट्र पोलिसांमार्फत संबंधितांचे मोबाइल कॉल तपासणे व अन्य माहिती घेणे हे आपल्या सरकारला नियमानुसार करता येईल. परंतु माहिती न घेता केवळ अंधारात बाण मारण्याचा केविलवाणा प्रयत्न मलिक करीत असल्याची टीका दरेकर यांनी केली.
The post अमली पदार्थ प्रकरणात भाजप नेत्याच्या मेव्हण्याची सुटका! appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3aukyex
via
No comments:
Post a Comment