मुंबई : क्रूझवरील अमली पदार्थ पार्टीप्रकरणी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याने जामिनाच्या मागणीसाठी शनिवारी सत्र न्यायालयात धाव घेतली. सोमवारी त्याचा जामीन अर्ज सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे. अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांतील आरोपींच्या जामीन अर्जावर विशेष सत्र न्यायालयातच सुनावणी घेऊ शकते, असे नमूद करत मुख्य महानगरदंडाधिकाऱ्यांनी आर्यनसह दोघांचा जामीन अर्ज फेटाळला होता.
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) गेल्या आठवड्यात छापा टाकत अमली पदार्थाची पार्टी उधळली होती. त्या वेळी क्रूझवर असलेल्या आर्यनला एनसीबीने अटक केली होती. सध्या आर्यन न्यायालयीन कोठडीत आहे. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यावर आर्यनच्या वकिलांनी लगेचच त्याच्या जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र या न्यायालयाला तीन वर्षांवरील शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यांतील आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्याचा अधिकार नाही. शिवाय याप्रकरणी अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा या विशेष कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर विशेष सत्र न्यायालयात सुनावणी व्हायला हवी, असा दावा करत एनसीबीने आर्यनच्या जामिनाला विरोध केला होता.
न्यायालयानेही एनसीबीचे म्हणणे मान्य करत आर्यनसह अरबाज मर्चंट, मुनमुन धनेचा या सहआरोपींचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे आर्यनने आता सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे.
The post आर्यन खानची जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3uVi5U9
via
No comments:
Post a Comment