|| शैलजा तिवले
वेग वाढवण्यासाठी पालिकेच्या उपाययोजना
मुंबई: शहरातील लसीकरण वेगाने होण्यासाठी आता पालिकेमार्फत इमारतींच्या आवारात किंवा झोपडपट्टी भागात लसीकरण शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता नागरिकांना घराजवळ लसीकरणाची व्यवस्था उपलब्ध होणार आहे.
झोपडपट्टीमध्ये किंवा काही इमारतींमध्ये मिळून लसीकरण शिबिर आयोजित करण्याची मुभा सर्व विभागांना देण्यात आली आहे. हे शिबिर कसे आणि कुठे आयोजित करावे याचे अधिकार सहाय्यक पालिका आयुक्तांना देण्यात येतील. त्यानुसार ज्या भागामध्ये लसीकरण झालेले नाही, अशा भागांमध्ये शिबिरे घेऊन मोठ्या प्रमाणात लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना विभागांना देण्यात येतील, अशी माहिती पालिकेचे आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
मुंबईबाहेरील नागरिक लसीकरणासाठी मुंबईत येत असले तरी त्यांचे प्रमाण सुमारे २० टक्के आहे. आता सर्वच ठिकाणी लसीकरण केंद्र उपलब्ध झाल्यामुळे मुंबईत लसीकरणासाठी येणाऱ्यांचे प्रमाण तुलनेने कमी झाले आहे. त्यात केंद्राने ५० टक्के पूर्वनोंदणी आणि ५० टक्के थेट लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र तरीही पालिकेने १०० टक्के थेट लसीकरण सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे विभागांमधील लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात तेथील रहिवाशांचेच लसीकरण होत आहे, असे काकाणी यांनी सांगितले.
लसीकरण केंद्रावर आता गर्दी बरीच कमी झाली आहे. बहुतांश नागरिकांची पहिली मात्रा झाली आहे, परंतु अनेकजण दुसरी मात्रा घेण्यासाठी ८४ दिवस झाले नाहीत म्हणून प्रतीक्षेत आहेत. झोपडपट्टी भागात लसीकरण तुलनेने कमी झाले असून येथे लसीकरणावर भर दिला जात आहे.
निर्णय का?
मुंबईत सुमारे ९२ टक्के नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली असली तरी अद्याप सुमारे ५० टक्के नागरिकांच्या दोन्ही मात्रा पूर्ण झालेल्या नाहीत. शहरात लसीकरण वेगाने करण्यासाठी आता नागरिकांसाठी घराजवळ लसीकरण उपलब्ध करून दिले जाणार आहे.
The post झोपडपट्टी, इमारतींच्या आवारातही लसीकरण शिबिरे appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3v1b9EP
via
No comments:
Post a Comment