समृद्ध शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शुभदा यांना लहानपणापासूनच घरातील संस्कारांमुळे, वाचनामुळे वेध लागले ते आदिवासींमध्ये राहून त्यांना समृद्ध जीवन देण्याचे. त्यासाठी त्या पोहोचल्या थेट गडचिरोलीत. गेली साडेतीन दशके कुरखेडा येथे राहून त्या काम करत आहेत. ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्थेची स्थापना करून ६५० बचत गटांच्या आणि त्यातील ६,५०० आदिवासी स्त्रियांच्या माध्यमातून दारूबंदी, बालमृत्यू, कुपोषण व वनहक्क या विषयांमधील प्रश्नांना वाचा फोडत आहेत. या सर्वांच्या प्रयत्नांमुळे कोरची तालुक्यातील ३० गावांतील बालमृत्यूचे प्रमाण दर हजारी ७२ वरून ३६ पर्यंत घटले असून नवीन पिढीतील १५०० आदिवासी स्त्रियांना स्थानिक वनौषधींबाबत प्रशिक्षण दिल्याने त्यांना रोजगाराचा मार्ग खुला झाला आहे. अशा कामांमुळे यंदाच्या ‘लोकसत्ता दुर्गा’ ठरल्या आहेत, आदिवासी स्त्रीला मानाचं जीवन देणाऱ्या शुभदा देशमुख.
विवेक गिरधारी
संपन्न कुटुंबातील व्यक्तींची पावले सामाजिक कार्यातील थेट सहभागाच्या दिशेने अपवादानेच वळतात. सामाजिक जाणीव अन् वंचितांविषयीची कणव यापुरतीच ती अनेकदा मर्यादित राहतात. परंतु शुभदा देशमुख याला अपवाद आहेत. घरचा समृद्धतेचा वारसा असूनही त्यांनी स्वत:ला तरुण वयातच सामाजिक कार्यात झोकून दिले. तेच आपले जीवितकार्य बनवले आणि आज गडचिरोलीसारख्या दुर्गम व मागास भागातील शेकडो अल्पशिक्षित आदिवासी स्त्रियांसाठी त्या आधारवड बनल्या आहेत. म्हणूनच त्या आहेत, यंदाच्या ‘लोकसत्ता दुर्गा’.
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची व कुरखेडा तालुक्यातील सुमारे ६५० बचत गटांचे त्या गेली दोन दशकांहून अधिक काळ संयोजन करत आहेत. बचत गटातील सुमारे साडेसहा हजार आदिवासी स्त्रियांच्या प्रबोधनातून दारूबंदी, बालमृत्यू, कुपोषण व वनहक्क आदी मूलभूत प्राधान्याचे विषय त्या हाताळत आहेत. आदिवासी स्त्रियांच्या सक्षमीकरणाचे काम त्या गेली साडेतीन दशके सातत्याने कुरखेडा येथे प्रत्यक्ष राहून करत आहेत.
शुभदा यांचा जन्म विदर्भातील वर्धा येथे संपन्न शेतकरी कुटुंबात झाला. घरी भरपूर शेती होती, समृद्धी होती. घरातील एकूण वातावरण पारंपरिक आणि सरंजामी थाटाचे होते. घरातील बायांनी घराबाहेर पडणे न रुचणारे होते. मात्र त्यांची आई मूळ कोकणातली व मुंबईतली आणि प्रागतिक विचारांची होती. घरातून विरोध असला तरी लहानग्या शुभदाला घेऊन त्या ‘राष्ट्र सेविका समिती’च्या उपक्रमांना जात असत. घरात आजोबांनी जोपासलेली मोठी ग्रंथसंपदा होती. त्यातून शुभदा यांना लहानपणापासून वाचनाची आवड निर्माण झाली. साने गुरुजींच्या वाङ्मयाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. तरुण वयात ‘राष्ट्र सेवा दला’शी आलेला संपर्क, समग्र क्रांतीचे प्रणेते जयप्रकाश नारायण यांचे वर्ध्यातील भाषण ऐकायची मिळालेली संधी यामुळे त्यांची पावले सामाजिक कार्याकडे वळली. त्यातूनच त्या महाविद्यालयीन दशेत ‘छात्र युवा संघर्ष वाहिनी’मध्ये सक्रिय झाल्या. यामुळे त्यांच्या पुढील आयुष्याची दिशाच बदलून गेली. त्यांनी सामाजिक सेवेतील पदव्युत्तर शिक्षण नागपूर विद्यापीठातून पूर्ण केले.
शुभदा देशमुख यांनी १९८३ मध्ये आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात गडचिरोलीतील वडसा- देसाईगंज परिसरातील बांधकाम लाकूड कामगार संघटनेच्या कामापासून केली. त्यातून त्यांना आदिवासींच्या शोषणाची परिभाषा कळली. या विषयात काम करणारे ज्येष्ठ कार्यकर्ते मोहनभाऊ हिरालाल व स्थानिक नेते सुखदेवबाबू ऊईके यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले. दरम्यानच्या काळात जयप्रकाश नारायण यांच्या खेड्यात जाऊन राहाण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी पुढील आयुष्याची मांडणी केली. आपल्या विचारांना अनुरूप, खेड्यात राहून काम करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या डॉ. सतीश गोगुलवार यांची जीवनाचा साथीदार म्हणून त्यांनी निवड केली. १९८४ मध्ये उभयतांनी गडचिरोलीतील कुरखेडा परिसर हे आपले कार्यक्षेत्र निवडून कामाला सुरुवात केली. त्यांनी सार्वजनिक आरोग्याबाबतचे प्रबोधन व जाणीवजागृती हे उद्दिष्ट ठेवून ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या संस्थेची स्थापना केली.
आदिवासी स्त्रियांमध्ये महिला मंडळांच्या माध्यमातून कामाला सुरुवात करताना सुरूवातीलाच दारूबंदीच्या विषयाने जोर धरला. कुरखेड्यामध्ये आदिवासी स्त्रियांचा दारूबंदीविरोधात मोठा मोर्चा निघाला. हळूहळू संपूर्ण जिल्हाभर आंदोलन पेटले. डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी या प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी केली. जिल्ह्यातील सुमारे ३५० महिला मंडळे व १०० तरुण मंडळे यांनी शासनाकडे दारूबंदीविषयक रीतसर ठराव करून पाठवले. अखेरीस १९९२ मध्ये संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी झाली. आजतागायत ती कायम आहे. दारूबंदीच्या निमित्ताने एकत्र आलेले आदिवासी स्त्रियांचे प्रासंगिक संघटन पुढील टप्प्यात कसे टिकवून ठेवता येईल याचा विचार करताना शुभदा यांचे लक्ष दक्षिणेकडील राज्यांत व पश्चिम महाराष्ट्रातही नव्याने चालू होत असलेल्या बचतगट उपक्रमाकडे वेधले गेले. १९९२ मध्ये कुरखेडामध्ये ५ रुपये मासिक बचतीचा आदिवासी स्त्रियांचा पहिला गट तयार झाला.
हळूहळू बचत गटांची संख्या वाढत गेली. आज संस्थेचे सुमारे ६५० बचतगट सक्रिय असून पुढील टप्प्यात निवडक बचत गटांचे परिसर संघही तयार करण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्याचा प्रमुख प्रश्न असलेल्या बालमृत्यू व कुपोषण या विषयांवरील कामात बचतगटांना सक्रिय केले. कोरची तालुक्यात गावातील बालमृत्यू टाळण्यासाठी काम करणाऱ्या ‘आरोग्य सखी’ निवडून त्यांना प्रशिक्षित केले. त्यातून ३० गावांतील बालमृत्यूचे प्रमाण दर हजारी ७२ वरून ३६ पर्यंत घटले. याच प्रकारे याच परिसरातील १२० गावांमध्ये कुपोषणाचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत घटवण्यात त्यांना यश आले. नवीन पिढीतील १,५०० आदिवासी स्त्रियांना स्थानिक वनौषधींचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. दरवर्षी या आदिवासींकडून २० टन मधाचे संकलन व विक्री करण्यात येते.
गावपातळीवरील रेशन, रोजगार हमी योजना, आरोग्य सेवा, अंगणवाडी, वनहक्क आदी सेवांची अंमलबजावणी व्यवस्थितपणे होण्यासाठी बचतगटातील आदिवासी स्त्रियांच्या मदतीने दबाव गट करण्यात आले आहेत. गावच्या जात पंचायतीमध्ये स्त्रियांना प्रतिनिधित्व मिळवून देण्यात यश आले आहे. अनेक वर्षं काम करणाऱ्या निवडक आदिवासी कार्यकत्र्यांना ‘महाराष्ट्र महिला हिंसामुक्ती परिषद’, ‘महिला किसान अधिकार मंच’ आणि ‘महाराष्ट्र महिला आरोग्य हक्क परिषद’ आदी राज्यस्तरीय नेटवर्कशी जोडून देण्यात आले. त्यातून त्यांचेही ज्ञान आणि आवाका वाढण्यास मदत झाली.
आदिवासी स्त्रिया व कार्यकर्त्यां यांच्या सक्षमीकरणातून त्यांच्या व एकूणच आदिवासी समाजाच्या भविष्याचा पाया दृढ होण्यास ‘दुर्गा’ शुभदा देशमुख यांचे कार्य नक्कीच फार मोलाचे व अनुकरणीय आहे.
संपर्क शुभदा देशमुख आम्ही आमच्या आरोग्यासाठी, कुरखेडा तालुका,
गडचिरोली – ४४१२०९
भ्रमणध्वनी – ९१६८६५५६९३
वेबसाइट : www.arogyasathi.org
ई-मेल : arogyasathi@gmail.com
मुख्य प्रायोजक : ग्रॅव्हीटस फाऊंडेशन
सह प्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, व्ही. पी. बेडेकर अॅँड सन्स प्रा. लि. सनटेक रिअल्टी लि.
पॉवर्ड बाय : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, शिवाजीनगर, पुणे, राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलाइजर्स लि.
The post विकासाचा वसा appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3FjNVhY
via
No comments:
Post a Comment