ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक १३ लाख नागरिक पहिल्या मात्रेपासून वंचित
मुंबई : राज्यात करोना प्रतिबंधात्मक लसीकरण वेगाने होत असले तरी सुमारे १ कोटी ४१ लाख नागरिकांनी लशीची पहिली मात्राही घेतलेली नाही. यात सर्वाधिक १३ लाख ८३ हजार नागरिक ठाणे जिल्ह्यातील आहेत. या खालोखाल नाशिक, जळगाव, नगर आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे.
करोनाचा प्रादुर्भाव नोव्हेंबरमध्ये कमी झाल्यानंतर लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी कमी होत गेली. परंतु डिसेंबरमध्ये ओमायक्रॉनच्या भीतीने पुन्हा लसीकरणासाठी गर्दी वाढू लागली. जानेवारीपासून सुरू झालेल्या या लसीकरण मोहिमेत सर्वाधिक दैनंदिन सरासरी लसीकरण डिसेंबरमध्ये झाले आहे. या काळात रोज सरासरी ८ लाख ७९ हजार नागरिकांना लस देण्यात आली. लसीकरणाचा वेग वाढला असला तरी अजूनही १५ टक्के नागरिकांना लशीची पहिली मात्रा देणे बाकी आहे.
ठाणे, नाशिक जिल्हा पिछाडीवर
राज्यात पहिली मात्रा न घेतलेले सर्वाधिक नागरिक ठाण्यात आहेत. यानंतर नाशिकमध्ये सुमारे ११ लाख ४० हजार, जळगावमध्ये सुमारे ८ लाख ५६ हजार, नगरमध्ये सुमारे ८ लाख ४५ हजार आणि नांदेडमध्ये ८ लाख १६ हजार नागरिकांनी पहिली मात्रा घेतलेली नाही. रत्नागिरी, वर्धा, भंडारा आणि सिंधुदुर्ग वगळता अन्य सर्व जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण एक लाखांहून अधिक आहे. पहिली मात्राही न घेतलेल्या नागरिकांची सर्वात कमी संख्या सुमारे ३० हजार सिंधुदुर्गमध्ये आहे. कोविनच्या आकडेवारीनुसार तर मुंबईत पहिल्या मात्रेचे लसीकरण १०६ टक्क्यांवर गेले आहे.
पुण्यात कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या मात्रेसाठी प्रतिक्षा
राज्यात ५१ टक्के नागरिकांच्या दोन्ही मात्रा पूर्ण झाल्या आहेत. यात कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या मात्रेची मर्यादा जास्त दिवस असल्यामुळे ८९ लाख ४६ हजार नागरिक दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षेत आहेत. यात सर्वाधिक सुमारे ११ लाख ८९ हजार पुण्यात, तर सुमारे ६ लाख ७९ हजार मुंबईत आहेत. त्या खालोखाल नाशिक, ठाणे, कोल्हापूर आणि नगरचा समावेश आहे.
कोव्हॅक्सिनचे १२ लाख नागरिक दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षेत
राज्यात १२ लाख २३ हजार नागरिक कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षेत आहेत. यात सर्वाधिक ९९ हजार नागरिक गोंदियामध्ये तर त्या खालोखाल बुलढाणा, पुणे, भंडारा, मुंबई या जिल्ह्यांचा समावेश आहे.
ठाणे जिल्ह्याचे प्रयत्न
लसीकरण वेगाने करण्यासाठी पहिली मात्रा न घेतलेल्या नागरिकांचा फोनद्वारे पाठपुरावा करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा सुरू केली आहे. रात्रीच्या वेळेत लसीकरण, लससाक्षरता यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे ठाण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे यांनी सांगितले.
The post राज्यात दीड कोटी नागरिक लसीकरणापासून दूर; ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक १३ लाख नागरिक पहिल्या मात्रेपासून वंचित appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3p8CYcZ
via
No comments:
Post a Comment