देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
मुंबई : राज्यात लोकशाही नव्हे, तर ‘रोकशाही आणि रोखशाही’ सुरू असून स्वपक्षीय आमदारांवर विश्वास नसल्याने भाजपच्या १२ आमदारांना चुकीच्या कारणांवरून निलंबित करण्यात आले असल्याचे टीकास्त्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सोडले. गेल्या दोन वर्षांत सरकारचे अस्तित्वच नसून अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीग्रस्त, करोना मृतांच्या कुटुंबीयांना मदतही करण्यात आलेली नाही. शिवभोजन थाळी योजनेतही मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप करीत विधिमंडळ अधिवेशनपूर्व चहापानावर विरोधक बहिष्कार टाकत असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बुधवारी सुरू होत असून महाविकास आघाडी सरकारला घेरण्याच्या दृष्टीने विरोधी पक्षाच्या निवडक आमदारांची बैठक झाल्यावर पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले, विरोधी पक्षांचा आवाज बंद करण्यासाठी जो प्रकार घडलाच नाही किंवा सभागृहाबाहेर झालेल्या प्रकाराचे कोणतेही पुरावे नसताना त्या कारणांवरून एक वर्षासाठी भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत भाजप आमदारांची संख्या कमी करण्यासाठी आणि आपल्या आमदारांवर विश्वास नसल्याने हे निलंबन करण्यात आले आहे. राज्यसभेत शिस्तभंग समितीपुढे प्रकरण गेले. संपूर्ण प्रक्रिया झाली, पुरावे तपासले गेले व अधिवेशनकाळापुरते खासदारांचे निलंबन झाले. ही लोकशाही असून महाराष्ट्रात यापैकी काहीच झाले नाही. ही तानाशाही आहे.
कुलगुरूंचे अधिकार कमी करणाऱ्या कायदेशीर तरतुदीस भाजप जोरदार विरोध करील. विद्यापीठे ताब्यात घेण्यासाठी अशी तरतूद देशातील कोणत्याही राज्याने केलेली नाही. हे सरकार पेट्रोल-डिझेलवरचे कर कमी न करता दारूवरील कर कमी करते. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हे सरकार संवेदनशील नाही. कायदा व सुव्यवस्था धोक्यात असून महिलांवरील अत्याचारांच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. आरोग्य, म्हाडा, पोलीस भरती परीक्षांमधील गैरव्यवहारांची सीबीआयकडून चौकशी झाली, तरच खरे सूत्रधार उघड होतील, असे फडणवीस यांनी सांगितले.
कर्नाटकमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेविषयी फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान कोठेही व कोणाकडूनही झाला तरी त्याचा निषेधच आहे; पण सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीही अवमान केला असून त्याबाबत सरकारने काहीही केले नाही. शिवभोजन थाळी योजनेत खोटे आकडे दाखवून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार सुरू आहे. महाराजांच्या नावे असलेल्या योजनेत भ्रष्टाचार हा त्यांचा अवमानच आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
The post राज्यात रोकशाही आणि रोखशाही!; देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3stWC5k
via
No comments:
Post a Comment