करोना काळात रुग्णांचे हाल
शैलजा तिवले
मुंबई : अंधेरीच्या मरोळ येथील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेला येत्या १७ डिसेंबरला तीन वर्षे वर्ष पूर्ण होत आले तरी अद्याप हे रुग्णालय बंद आहे. करोना साथीच्या काळात ३५० खाटांचे रुग्णालय बंद असल्यामुळे रुग्णांची प्रचंड गैरसोय झाली. मरोळच्या कामगार रुग्णालयाला डिसेंबर २०१८ मध्ये आग लागली होती. या घटनेनंतर दुरुस्तीच्या नावाखाली रुग्णालय बंद करण्यात आले. तात्पुरत्या काळासाठी कांदिवली येथील कामगार रुग्णालयात ते हलविण्यात आले होते. मात्र, तीन वर्ष उलटत आली तरी रुग्णालयाची दुरुस्ती अद्याप पूर्ण झालेली नाही.
मरोळच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागासह एमआरआय, सिटी स्कॅन इत्यादी सुविधा उपलब्ध होत्या. कांदिवलीच्या कामगार रुग्णालयात रुग्ण दाखल केले जात असले तरी येथे फक्त छोटय़ा शस्त्रक्रिया केल्या जातात. अतिदक्षता विभागासह एमआरआय अन्य अद्ययावत सुविधाही येथे नसल्यामुळे रुग्णांना पुढील उपचारासाठी पालिकेच्या रुग्णालयांत पाठविले जाते.
करोना काळात तर पालिकेची रुग्णालये करोनासाठी राखीव केल्यामुळे कामगारांचे आणखीनच हाल झाले. या रुग्णालयाची दुरुस्ती वेळेत पूर्ण झाली असती तर करोनाकाळात खाटा मिळत नसल्यामुळे रुग्णांचे हाल झाले नसते. परंतु कामगार विमा रुग्णालय प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अद्याप हे रुग्णालय बंद आहे, असे मत येथील कामगारांनी व्यक्त केले.
रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग सुरू केल्यास कामगारांना उच्च रक्तदाब, मधुमेह या नियमित आजारांसाठीही कांदिवलीपर्यंत धाव घ्यावी लागणार नाही, अशीही मागणी कामगारांनी केली आहे. रुग्णालय इमारतीच्या दुरुस्तीबाबत कामगारांनी अनेकदा मागणी करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. रुग्णालय परिसरातील जुनी इमारत पाडून नवी इमारत उभारणीचे कामकाज हाती घेतले आणि ही इमारत आता पूर्ण झाली आहे. परंतु आगीत जळालेल्या इमारतीच्या दुरुस्तीचे कामकाज तातडीने केलेले नाही, असेही कामगारांनी सांगितले.
लवकरच बाह्यरुग्ण विभाग सुरू होणार
रुग्णालयाच्या इमारतीतील काही भागाची डागडुजी पूर्ण झाली असून लवकरच बाह्यरुग्ण विभाग सुरु केला जाईल. अग्निशमन विभागाकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे. त्यांनी मंजुरी दिल्यावर १५ दिवसात हा विभाग सुरू होईल. करोनाकाळात सर्वच कामे ठप्प असल्याने इमारतीच्या दुरुस्तीसाठी वेळ लागल्याचे राज्य कामगार विमा महामंडळाचे (ईएसआयसी) विभागीय संचालक प्रणय सिन्हा यांनी सांगितले.
रुग्णालय पूर्णपणे कार्यरत होण्यास प्रतीक्षाच
रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यापुरती डागडुजी केली असली तरी संपूर्ण इमारतीची दुरुस्ती अजून पूर्ण झालेली नाही. त्यात नव्याने बांधलेली इमारत रुग्णालयाच्या इमारतीला जोडण्यात येणार असल्याने याचेही बरेचसे बांधकाम अजून पूर्ण झालेले नाही. याच्या निविदा काढल्या जातील. त्यामुळे पूर्ण रुग्णालय कार्यरत केव्हा होईल हे सध्या सांगणे कठीण आहे, असे सिन्हा यांनी सांगितले.
The post तीन वर्षांनंतरही मरोळ कामगार रुग्णालय बंदच appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3EUdy8x
via
No comments:
Post a Comment