म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून निविदा काढण्यास सुरुवात
मुंबई : गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील म्हाडाच्या हिश्श्यातील (सोडतीसाठीची घरे) घरांच्या बंद पडलेल्या बांधकामास आता लवकरच सुरुवात होणार आहे. येत्या १५ दिवसांत हिश्श्यातील घरांच्या बांधकामासाठी निविदा काढण्यात येणार आहेत. म्हाडाच्या मुंबई मंडळाने निविदा काढण्यास सुरुवात केली आहे.
पत्राचाळीचा पुनर्विकास २००८ पासून रखडला आहे. या प्रकल्पात विकासकाने कोटय़वधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला असून ६७२ मूळ रहिवासी १३ वर्षांपासून बेघर आहेत. त्याच वेळी मागील पाच वर्षांपासून मुंबई मंडळाच्या सोडतीतील ३०६ विजेते घरांच्या प्रतीक्षेत आहेत.
मुंबई मंडळालाही आपल्या हिश्श्यातील २७०० घरे विकासकाने दिलेली नाहीत. पण आता मात्र मूळ रहिवासी, सोडतीतील विजेत्यांची घराची प्रतीक्षा संपणार असून मंडळालाही २७०० घरे उपलब्ध होणार आहेत. प्रकल्पात आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी विकासकाविरोधात कायदेशीर कारवाई सुरू असून राज्य सरकारने विकासकाला दणका दिला आहे. काही वर्षांपूर्वीच विकासकांकडून प्रकल्प काढून घेऊन तो म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ताब्यात दिला आहे. त्यानुसार आता मंडळाने प्रत्यक्ष प्रकल्पात बंद पडलेले बांधकाम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकल्पातील पुनर्वसन इमारतीच्या बांधकामासाठी यापूर्वीच निविदा काढली असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नव्या वर्षांत पुनर्वसन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येणार आहे. हे काम सुरू झाल्यापासून तीन वर्षांत पूर्ण करण्याचे मंडळाचे नियोजन आहे. प्रकल्पात ११ मजली आठ पुनर्वसन इमारतींचा समावेश असून यातील ४० टक्केच काम विकासकाने पूर्ण केले आहे. पुनर्वसन इमारतीच्या बांधमकामासाठी निविदा प्रक्रिया सुरू असताना आता मंडळाने सोडतीतील घरांच्या कामाला ही सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी येत्या १५ दिवसांत निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी दिली. येत्या काही महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण करून इमारतींच्या बांधकामाला लवकरात लवकर सुरुवात करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. काम सुरू झाल्यापासून दोन वर्षांत ते पूर्ण करण्याचे मंडळाचे नियोजन आहे. काम पूर्ण झाल्यास २०१६ च्या सोडतीतील ३०६ विजेत्यांना घराचा ताबा देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तर नवीन सोडतीसाठी २४०० घरे (२०१६ सोडतीतील ३०६ घरे वगळून) उपलब्ध होणार आहेत.
The post पत्राचाळ पुनर्विकास अखेर मार्गी appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3pWrYyN
via
No comments:
Post a Comment