मंगळवारी २ लाख ५ हजार प्रवाशांची नोंद
मुंबई : करोना निर्बंधांत आलेली शिथिलता आणि करोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली घट यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले असताना मुंबईतील पहिल्या मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांची संख्याही वेगाने वाढू लागली आहे. करोनाच्या पहिल्या लाटेनंतर सेवा सुरू झालेल्या मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांची संख्या बारा हजारांवरून दोन लाखांवर पोहोचली आहे. ‘मेट्रो १’मधून मंगळवारी (१४ डिसेंबर) सर्वाधिक २ लाख ५ हजार ३३४ प्रवाशांची नोंद करण्यात आली.
घाटकोपर-अंधेरी-वर्सोवादरम्यान सुरू झालेल्या मेट्रो सेवेला सुरुवातीपासूनच प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. करोनापूर्व काळात ‘मेट्रो १’मधून चार लाख ५५ हजार प्रवासी दररोज प्रवास करत होते. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर ‘मेट्रो १’ची सेवा २२ मार्च २०२१ ते १८ ऑक्टोबर २०२१ दरम्यान तब्बल २११ दिवस बंद होती. राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर १९ ऑक्टोबरला ‘मेट्रो १’ पुन्हा वाहतूक सेवेत रुजू झाली. मात्र ५० टक्के प्रवासी क्षमतेसह ‘मेट्रो १’ सुरू झाल्याने आणि करोनाचे संकट कायम असल्याने प्रवासी संख्या खूपच कमी होती.
पहिल्या दिवशी केवळ १२ हजार ७३८ प्रवाशांनी ‘मेट्रो १’मधून प्रवास केला होता. त्यानंतर हळूहळू प्रवाशांची संख्या वाढत गेली आणि मंगळवारी, १४ डिसेंबरला ‘मेट्रो १’ने प्रवाशी संख्येचा दोन लाखांचा पल्ला गाठल्याची माहिती मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडून (एमएमओपीएल) देण्यात आली. १४ डिसेंबरला दोन लाख पाच हजार ३३४ इतकी प्रवासी संख्या नोंदवली गेली. करोनाकाळात बंद असलेली ‘मेट्रो १’ची सेवा पुन्हा सुरू झल्यानंतर पहिल्यांदाच प्रवासी संख्या दोन लाखांच्या पुढे गेल्याचे सांगत एमएमओपीएलने याबाबत समाधान व्यक्त केले. तर लवकरच करोनापूर्व काळाप्रमाणे पुन्हा दिवसाला चार लाख प्रवासी ‘मेट्रो १’मधून प्रवास करू लागतील असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.
The post ‘मेट्रो १’ ची प्रवासी संख्या दोन लाखांवर appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3s67ndR
via
No comments:
Post a Comment