‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाचे लहाने यांच्याकडून कौतुक
मुंबई : विविधांगी सामाजिक कार्यात सक्रिय असणारे एकत्र आले तर एकमेकांच्या मार्गदर्शनातून, परस्परपूरक विचार आणि कृतीतून समाजासाठी त्यांनी उभारलेले कार्य व्यापक स्तरावर पुढे जाईल. ११२ सामाजिक संस्थांना आर्थिक मदत मिळवून देत समाजकार्याची साखळी निर्माण करणारा हा दानयज्ञ महत्त्वाचा आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ नेत्रचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांनी लोकसत्ताच्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाचे कौतुक केले.
विविध क्षेत्रांत विधायक काम करणाऱ्या सामाजिक संस्था आणि दानशूर वाचकांना एकत्र आणणारा सेतू म्हणून पुढे आलेल्या लोकसत्ता ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाचा पूर्तता समारंभ सोमवारी दादर-माटुंगा कल्चरल सेंटर येथे आयोजित करण्यात आला होता. या समारंभात डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते सहभागी संस्थांना धनादेश वितरित करण्यात आले. डॉ. लहाने स्वत: सामाजिक आस्थेतून गेली कित्येक वर्षे गरजूंसाठी मोफत नेत्रचिकित्सा करत आहेत. सामाजिक कार्य करताना अनंत अडचणी येत असतात. आर्थिक पाठबळ उपलब्ध नसल्याने कामात येणाऱ्या अडथळ्यांचा वाटा मोठा असतो. अशा वेळी खचून न जाता मनापासून समाजकार्यात झोकून दिले पाहिजे. या कार्यातून मिळणारा आनंद किती मोठा असतो, त्याचा वैयक्तिक विकासासाठी आपल्याला नेमका कसा उपयोग होतो, हे उलगडणारे स्वानुभवही त्यांनी उपस्थितांना सांगितले.
समाजासाठी काम करणाऱ्यांशी सुदृढ नाते जोडणाऱ्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमातून दरवर्षी दोन ते अडीच कोटींची आर्थिक मदत उभी राहते. चांगल्या कार्यासाठी वाटेल तेवढी मदत करायला लोक तयार आहेत. त्यांच्यापर्यंत समाजासाठी लाखमोलाचे कार्य उभारणाऱ्या या संस्थांची माहिती पोहोचवणारा वाहक, त्यांच्यातील दुवा होण्याच्या उद्देशाने ‘लोकसत्ता’ गेली अकरा वर्षे हा उपक्रम राबवत आहे, अशा शब्दांत या उपक्रमामागची भूमिका ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी आपल्या प्रास्ताविकातून स्पष्ट केली. महाराष्ट्रात अनेक वाचनालये आहेत, आपल्याकडे शतायुषी असलेली अशी शंभर वाचनालये आहेत ही माहिती मिळाल्यानंतर ‘लोकसत्ता’ने त्यावर विशेषांक केला. इतक्या मोठ्या संस्था, मोठ्या व्यक्ती आपल्याकडे कार्यरत आहेत. समाजात चाललेल्या वाईटाची जाणीव करून देणे ही वृत्तपत्राची जबाबदारीच आहे. त्याचबरोबरीने समाजात चाललेल्या चांगल्या कार्याची ठाशीवपणे माहिती देणे आणि या चांगल्यासाठी मदत करा असे लोकांना आवाहन करणे या दुहेरी जबाबदारीतून ‘सर्वकार्येषु सर्वदा’चा उपक्रम उभा राहिला आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
या समारंभात दि कॉसमॉस को-ऑप. बँक लिमिटेडचे जितेंद्र आंबेरकर यांनी डॉ. तात्याराव लहाने यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ‘सर्वकार्येषु सर्वदा’सारखे उपक्रम करणाऱ्या ‘लोकसत्ता’शी गेली २७ वर्षे वाचक म्हणून आपण जोडले गेलो आहोत, याबद्दल लहाने यांनी आनंद व्यक्त केला. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून चुकीच्या घटनांवर टीका करणे हे वृत्तपत्रांचे कामच आहे, मात्र चांगले काय, आदर्श काय आहे हे सांगणारी पत्रकारिता राहिलेली नाही. राज्यात कानाकोपऱ्यात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचा ‘लोकसत्ता’शी काही संबंध नाही, तरीही सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून या संस्थांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ‘लोकसत्ता’सारखे वृत्तपत्र करत आहे. एकप्रकारे तुमचे कार्य यशस्वी होण्याची सिद्धी ‘सर्वकार्येषु सर्वदा’ने तुम्हाला दिली आहे. त्याचा योग्य उपयोग करा, असेही त्यांनी या वेळी सांगितले. सहज संवादातून रंगत गेलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी नीलेश अडसूळ यांनी केले. तर दि कॉसमॉस बँक को-ऑप. लिमिटेड हे या कार्यक्रमाचे बँकिंग पार्टनर होते.
११२ संस्थांचे संमेलन भरवण्याचा मानस
‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमातून आत्तापर्यंत मदत करण्यात आलेल्या ११२ सामाजिक संस्थांचे एकत्र संमेलन भरवण्याचा मानस असल्याचे गिरीश कुबेर यांनी सांगितले. भरीव कार्य करणाऱ्यांचे हात एकत्र जोडले जाणे ही महाराष्ट्राची गरज आहे. समाजकार्याची साखळी निर्माण झाली पाहिजे, त्या दृष्टीने हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या संस्थांना मदत…
दिशा एज्युकेशन फाऊंडेशन (अमरावती), स्मित वृद्धालय (ठाणे), रामचंद्र प्रतिष्ठान (दादर), त्वष्टा कासार समाज सेवा संस्था वाचन मंदिर (पुणे), उगम फाऊंडेशन (सांगली), व्हॉइस ऑफ दी व्हॉइसलेस अभियान (सोलापूर), आपलं घर (उस्मानाबाद), डॉ. एम. एल. ढवळे मेमोरियल ट्रस्ट (पालघर), मातृमंदिर (रत्नागिरी), आपलं पर्यावरण संस्था (नाशिक) या दहा संस्थांना धनादेश वितरित करण्यात आले.
वाय. एम. देवस्थळींचे स्मरण
एल अँड टी चे मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत देवस्थळी ’लोकसत्ता सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाशी जोडले गेले होते. उपक्रमात सहभागी संस्थांना आर्थिक मदती पलीकडे प्रत्यक्ष सहभागातून ते मदत करत असे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी ’लोकसत्ता सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमातील संस्थांना ते भेट द्यायचे. त्यांच्या निधनापूर्वी त्यांनी एका संस्थेला भेट देऊन ४० लाखांची मदत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या निधनानंतर हे आश्वासन त्यांच्या पत्नीने पूर्ण केले. सामाजिक बांधीलकी जोपासणारे देवस्थळींसारख्या व्यक्ती या उपक्रमाचा भाग होता हे हेवा वाटणारे आहे.
The post समाजकार्याची साखळी निर्माण करणारा दानयज्ञ; ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाचे लहाने यांच्याकडून कौतुक appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3FmDdXS
via
No comments:
Post a Comment