सरकारी महसूल बुडवून कोटय़वधींची उलाढाल
अनिश पाटील
मुंबई : बेकायदा ऑनलाइन लॉटरी चालवून सरकारचा कोटय़वधींचा महसूल बुडवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दादर येथील कार्यालयातून मुख्य आरोपी आंचल चौरसिया व त्याचे साथीदार ‘रॉलेट’, ‘बिंगो’, ‘फिवर जोकर’ अशा विविध नावाने १७ लॉटरी चालवत होते. ‘गेम किंग’ नावाने २०१८ मध्ये जगभरातील १५ देश व भारतातील सात राज्यांमुळे बेकायदा ऑनलाइन लॉटरी चालवणाऱ्या आंचल चौरसियाला यापूर्वी अटक झाली होती. याप्रकरणात आंचलचे वडील रमेश चौरसिया याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादर येथील एल्फिन्स्टन रोडवरील नमन मिड टाऊन इमारतीतील एका कार्यालयातून आंचल चौरसिया ऑनलाइन लॉटरीमध्ये पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती गुन्हे शाखेच्या ‘कक्ष ३’च्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तेथे छापा टाकून पोलिसांनी ऑनलाइन लॉटरी चालवणाऱ्या रॅकेट उघडकीस आणले आहे.
याप्रकरणी आंचल चौरसिया, त्याचे वडील रमेश चौरसिया, रविकुमार घोशिकुडा, मनमोहनसिंह शेखावर ऊर्फ मॉण्टी, कमलेश सांकला, कौशल पांडे व राजा मुन्ना यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आंचलसह पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. रमेश चौरसिया व राजा मुन्ना अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. याप्रकरणी पोलिसांना जप्त केलेले लॅपटॉप, मोबाइल सायबर न्यायावैध्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे.
आंचल व रमेश चौरसिया यांना २०१८ मध्ये सायबर पोलिसांनी हरियाणातून अटक केली होती. आंचल चौरसियाविरोधात मुंबईतील व्ही. पी. रोड, मेघवाडी, डी. एन. नगर, चेंबूर, नागपाडा, जे. जे. मार्ग, डी. बी. मार्ग, डोंगरी पोलीस ठाण्यांसह दिल्ली, लुधियाना, फरिदाबाद, नागपूर, नोएडा, फिरोजपूर, इंदौर, उज्जैन, धर, जालंधर व मेरठ येथेही गुन्हे दाखल आहेत. आरोपींवर २०१४ पासून १९ गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.
ऑनलाइन लॉटरीचा कारभार
अॅप्लिकेशनच्या माध्यमातून हा सर्व प्रकार चालायचा. त्याच्या माध्यमातून ग्राहकांना ‘रॉलेट’, बिंगो’, ‘फिवर’ ‘जोकर’, ‘बोनस’, ‘चेकर्स’, ‘अंदर बाहर’, ‘जॉइंट जॅकपॉट’, ‘सेवन अप सेवन डाऊन’,‘सुपर गोल्डन व्हील’, ‘रिच व्हील’ अशा १७ विविध लॉटरी खेळण्यास मिळायचे. प्रत्येक तासाला ६० ड्रॉ काढले जायचे. यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती, तसेच सरकारकडून यासाठी कोणताही परवाना घेण्यात आला नव्हता. ऑनलाइन पैसे भरल्यानंतर सॉफ्टवेअरचा लॉगइन पासवर्ड मिळायचा. त्यात भरलेल्या रकमेच्या किमतीचे पॉईंट जमा व्हायचे. त्याच्या सहाय्याने लॉटरी खेळली जायची. अधिकाधिक लोकांना त्यात समाविष्ठ करण्यासाठी सुरुवातीला खेळणाऱ्याला जिंकवले जायचे. त्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर केला जात असल्याचा संशय पोलिसांना आहे.
The post १७ बेकायदा ऑनलाइन लॉटरीला चाप appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3qbUj4c
via
No comments:
Post a Comment