लोकसंख्येच्या प्रमाणात प्राथमिक दवाखान्यांची संख्या जेमतेम २० टक्के
मुंबई : करोनाकाळात मुंबई महापालिकेने उभारलेल्या तात्पुरत्या आरोग्य व्यवस्थेची प्रशंसा होत असली तरी पालिकेची मूलभूत सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आजही कमकुवत असल्याचे निरीक्षण ‘मुंबई फस्र्ट’ आणि प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात नोंदवण्यात आले आहे. मुंबईतील लोकसंख्येच्या तुलनेत ८५८ प्राथमिक दवाखान्यांची गरज असताना प्रत्यक्षात त्याच्या केवळ वीस टक्केच, १९९ दवाखाने सध्या कार्यरत असल्याचे या अहवालातून उघड होत आहे. आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी रिक्त पदे भरणे, लोकसंख्येच्या तुलनेत सरकारी दवाखान्यांची संख्या आणि अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी तरतूद वाढविणे आवश्यक असल्याचे या संस्थांनी बुधवारी जाहीर केलेल्या मुंबईच्या सार्वजनिक आरोग्याच्या जाहीरनाम्यात अधोरेखित करण्यात आले आहे.
मुंबईतील प्राथमिक आरोग्य सेवेच्या गरजा व त्रुटी याचा आढावा या जाहीरनाम्यात घेतला आहे. पालिकेने या आर्थिक वर्षांत अर्थसंकल्पाच्या १२ टक्के तरतूद केली. करोनाकाळात पालिकेच्या सार्वजनिक आणि प्राथमिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित झाले. मात्र तरीही प्राथमिक आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी केवळ २० टक्के तरतूद आरोग्याच्या अर्थसंकल्पात केली आहे. लोकसंख्येच्या तुलनेत मुंबईत ८५८ प्राथमिक दवाखान्यांची आवश्यकता असून केवळ १९९ दवाखाने सध्या उपलब्ध आहेत. यातील केवळ १५ दवाखानेच १४ तास सुरू असतात. इतर दवाखाने पाच ते सहा तासच सुरू असतात, असे यात नमूद केले आहे.
अहवालातील सूचना
- मुंबईत वैद्यकीय आस्थापना कायद्याची अंमलबजावणी आवश्यक.
- आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (एचएमआयएस) अधिक सक्षम करणे आवश्यक. आरोग्य व्यवस्थेतील अद्ययावत माहिती संकलित करणे, वेळेत उपलब्ध करणे आणि मृत्यूच्या कारणांची वेळेत नोंद करणे गरजेचे.
- आरोग्य केंद्र आणि आपत्कालीन सेवांच्या कामकाज प्रक्रियेचे त्रयस्थ संस्थेकडून लेखापरीक्षण करून घ्यावे.
- शालेय विद्यार्थ्यांसह मुली, महिला यांच्या आरोग्यावर विशेष लक्ष देणे आवश्यक.
- राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात आरोग्य तरतुदीचा उल्लेख असावा.
The post आरोग्य यंत्रणा कमकुवतच appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3stxo7m
via
No comments:
Post a Comment