छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची विटंबना
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची बंगळुरु येथे झालेल्या विटंबनेची घटना, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्यास क्षुल्लक संबोधणे आणि सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून होत असलेली दडपशाही याबाबत निषेध करणारा निंदाव्यंजक ठराव राज्य सरकारतर्फे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी विधानपरिषदेत सादर केला. सर्वपक्षीय सदस्यांनी त्याबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या असून पुढील आठवडय़ात या ठरावावर चर्चा होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत असून त्यांचा अवमान कधीही खपवून घेतला जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा अनेकदा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. भाजपने २०१४ व २०१९ मध्येही निवडणुका लढविताना छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण केले होते. पण तरीही कर्नाटकमध्ये शिवाजी महाराजांच्या अवमानाच्या घटना घडल्या असून दोषींवर कारवाई झालेली नाही आणि तेथील मुख्यमंत्र्यांनी पुतळा विटंबनेच्या प्रकाराला किरकोळ समजणे, याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
कर्नाटक सरकार सीमाभागातील मराठी भाषिकांवर दडपशाही करीत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी दीपक दळवी यांच्यावर नुकतीच शाईफेक करण्यात आली. बेळगावात विधीमंडळ उभारुन अधिवेशन घेतले जाते. कर्नाटक सरकारकडून सीमावासियांवर दडपशाही व अन्याय सुरु असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी शिंदे यांनी केली. त्यावर हे प्रकार गंभीर असून या ठरावावर चर्चा घेण्याची मागणी शिवसेना आमदार दिवाकर रावते यांनी केली.
कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची विटंबना, तेथील मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य, कर्नाटकमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी आणण्याचा प्रस्ताव आदी मुद्दय़ांवर राज्य सरकार विधिमंडळात ठराव आणणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी विधान परिषदेत सांगितले. शेकापचे जयंत पाटील यांनी यासंदर्भात सभागृहाचे कामकाज सुरू होताच मुद्दा उपस्थित केला. कर्नाटक सरकार महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याच्या विचारात असून महाराष्ट्र सरकार व जनता सीमाभागातील जनतेच्या बरोबर आहे, हा संदेश देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पाटील यांनी केले. त्यावर सरकार या भावनांशी सहमत असल्याचे पवार यांनी नमूद केले.
The post कर्नाटक सरकारच्या निषेधाचा विधान परिषदेत ठराव; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची विटंबना appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3pkVK15
via
No comments:
Post a Comment