सुरत : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासमोर राज्यातील भूसंपादनाचे आव्हान असून अवघे ४० टक्केच भूसंपादन झाले आहे. महाराष्ट्रात भूसंपादनाशिवाय मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची अंतिम मुदत निश्चित करणे अशक्य असल्याची खंत नॅशनल रेल्वे हायस्पीड कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक सतीशचंद्र अग्निहोत्री यांनी व्यक्त केली. सुरत येथे बुलेट ट्रेनच्या कािस्टग यार्डमध्ये गर्डरच्या सुटय़ा भागांची होणारी साचेबांधणी, बुलेट ट्रेन प्रकल्पाची सद्यस्थिती, गुजरातमधील प्रकल्पाचे काम याची माहीती अग्निहोत्री यांनी पत्रकारांना दिली. यावेळी त्यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या कामाबाबतची स्थिती मांडली. प्रकल्पासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील जमीन अद्याप मिळाली नसून त्याबाबत राज्य सरकारशी चर्चा सुरू आहे. वांद्रे कुर्ला संकुल ते कल्याण शिळफाटा असा २१ किलोमीटरचा भुयारी मार्ग तयार करण्यासाठी सहा वर्षे लागणार आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रियाही सुरू केली आहे. हे एक मोठे आव्हान असून त्यामुळे महाराष्ट्रातील भूसंपादन वेळेत होणे गरजेचे असल्याचे मत अग्निहोत्री यांनी व्यक्त केले. कामाची स्थिती मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी एकूण 1,396 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. यामध्ये १०२४.८६ हेक्टर खासगी आणि ३७१.१४ हेक्टर जमीन सरकारी आहे. यात गुजरातमध्ये ९८ टक्के आणि महाराष्ट्रात फक्त ४० टक्के भूसंपादन आणि दादरा नगर हवेलीत १०० टक्के भूसंपादन झाले आहे. मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातील एकूण ४३२ हेक्टर जागा संपादित करावी लागणार आहे. यापैकी केवळ १९० हेक्टर जागा ताब्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात २८७ हेक्टरपैकी ८२ हेक्टर आणि ठाणे जिल्ह्यात १४० हेक्टरपैकी ९२ हेक्टर भूसंपादन झाले आहे. मुंबईत ४.८२ हेक्टरपैकी एकही जमीन संपादित झालेली नाही.
सुरत ते बिलिमोरा २०२७ पर्यंत
भूसंपादनामुळे महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेळ लागत आहे. त्यामुळे गुजरातमध्ये प्रकल्पाच्या कामाला गती दिली जात असून पहिली बुलेट ट्रेन सुरत ते बिलिमोरा धावणार आहे. त्याचे काम २०२७ पर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर पहिली बुलेट ट्रेन या मार्गावर धावेल. प्रकल्पासाठी खांब उभारणी, गर्डर टाकणे यासह अन्य कामांना सुरुवात केली आहे. ही मार्गिका ५० किलोमीटर लांबीची आहे.
गर्डरची साचेबांधणी सुरू
सुरत येथे वक्ताना या ठिकाणी गर्डरच्या साचेबांधणीसाठी कािस्टग यार्ड उभारण्यात आले आहे. २२ एकर जागेत यार्ड उभारणी केली आहे. गर्डरच्या साच्यांचे तुकडे जोडून येथे गर्डर तयार केला जातो. तसेच मार्गिकांसाठी लागणाऱ्या खांबांचेही काम येथे केले जात आहे. नऊ किलोमीटरसाठी २९४ स्पॅन येथे तयार केले जाणार आहेत.
भू तांत्रिक प्रयोगशाळेची उभारणी बुलेट ट्रेन प्रकल्पात गर्डर, खांब उभारणीचे मोठे काम करावे लागणार आहे. त्याआधी विविध चाचण्या केल्यावरच ही कामे पुढे सरकतात. यासाठी रेल्वे हायस्पीड कॉर्पोरेशने एल अँड टी कंपनीला बुलेट ट्रेन प्रकल्पातील भू तांत्रिक प्रयोगशाळा उभारणीचे काम दिले असून ही प्रयोगशाळा दहा महिन्यांपूर्वी उभी राहिली. माती, त्याचे वजन यासह ११ प्रकारच्या विविध चाचण्या होतात. आतापर्यंत १७ लाख ५० हजार चाचण्या केल्या असून आणखी साधारण २० लाख चाचण्या केल्या जाणार आहेत.
‘बीकेसी’येथील स्थानक उभारणीतील अडथळा दूर
मुंबई : मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील बीकेसी स्थानकाच्या आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राच्या उभारणीमधील अडथळा दूर झाला आहे. या प्रकल्पासाठी वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या प्रशासकीय इमारतीसह पेट्रोल पंप स्थलांतरित करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पर्यायी जागा दिली आहे. यासाठीच्या प्रस्तावाला प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
बीकेसीमध्ये एमएमआरडीए ५० हेक्टर जागेवर जागतिक वित्तीय सेवा केंद्र उभारणार आहे. मात्र या प्रकल्पाच्या जागेवरील १० हेक्टर जागेवर बीकेसी बुलेट ट्रेन स्थानक उभारण्यासाठी एनएचएसआरसीएलने या जागेची मागणी केली. बुलेट ट्रेनमुळे जागतिक वित्तीय सेवा केंद्र प्रकल्प बारगळणार असे वाटत असतानाच भुयारी बुलेट ट्रेन स्थानक बांधून त्यावर जागतिक वित्तीय सेवा केंद्र बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. एनएचएसआरसीएलकडून बीकेसी बुलेट ट्रेन स्थानकासाठीची निविदा प्रक्रिया सुरू आहे. मात्र भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या जागेच्या स्थलांतराचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने स्थानकाचे काम पुढे नेता येत नसल्याचे एनएचएसआरसीएलकडून सांगितले जात होते. पण अखेर प्राधिकरण बैठकीत हा प्रश्न निकाली काढण्यात आल्याचे माहिती एमएमआरडीएतील उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली.
बुलेट ट्रेनच्या या प्रकल्पामुळे पेट्रोल पंप, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनची इमारत, अग्निशमन केंद्र आणि पत्रावाला प्लॉट यामुळे बाधित होणार असल्याने यासाठी पर्यायी जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एशियन हार्ट रुग्णालयासमोरच्या मोकळय़ा भूखंडावर पेट्रोल पंप, प्रशासकीय इमारत आणि अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी पर्यायी जागा देण्यात आली. पत्रावाला प्लॉटधारकाने मोबदला घेत जागा देण्यास होकार दिला आहे. तर अग्निशमन केंद्र तातडीने स्थलांतरित करण्याची गरज नाही. मात्र पेट्रोल पंप आणि भारतीय पेट्रोलियम कॉर्पोरेशनची इमारत स्थलांतरित करणे गरजेचे असल्याने यासाठी अखेर एमएमआरडीएने पर्यायी जागा शोधत हा प्रश्न निकाली काढला आहे.
The post राज्यात बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भूसंपादनाचे आव्हान ; मुंबई-अहमदाबाद प्रकल्पासाठी फक्त ४० टक्के भूसंपादन appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3Ew3TnI
via
No comments:
Post a Comment