परवानगीशिवाय रुग्ण दाखल करण्यास मनाई
मुंबई : करोनाचा संसर्ग अतिवेगाने पसरत असताना रुग्णालयांतील रुग्णशय्यांचे योग्य नियोजन व्हावे तसेच आवश्यक असलेल्या रुग्णांनाच रुग्णालयीन उपचार मिळावेत, यासाठी मुंबई महापालिकेने गुरुवारी खासगी रुग्णालयांसाठी सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटा करोनाबाधितांसाठी राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून करोना नियंत्रण केंद्राच्या सूचनेशिवाय रुग्ण दाखल करू नये, असे आदेशही देण्यात आले आहेत.
ओमायक्रॉन उत्परिवर्तित विषाणूच्या प्रादुर्भावामुळे करोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. मात्र, त्यापैकी केवळ दहा ते बारा टक्के रुग्णांमध्ये लक्षणे आढळत असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. मात्र, लक्षणे नसतानाही किंवा सौम्य लक्षणे असतानाही अनेक रुग्ण भीतीपोटी खासगी रुग्णालयांत दाखल होतात. गतवेळच्या करोना लाटेचा हा अनुभव असून यंदाही खासगी रुग्णालयांतील खाटांची मागणी वाढली आहे. त्यामुळे महापालिकेने या रुग्णालयांसाठी सूचना जारी केल्या आहेत. ५ मे २०२१ रोजी खासगी रुग्णालयात जेवढ्या खाटा करोनाबाधितांसाठी राखीव ठेवल्या होत्या, तेवढ्या खाटा १० जानेवारीपासून राखीव ठेवाव्यात, असे आदेश पालिकेने दिले आहेत. खासगी रुग्णालयांमधील खाटांची क्षमता आणि राखीव ठेवलेल्या खाटा यांची तपासणी ११ जानेवारीला करण्याचे आदेश विभागाच्या साहाय्यक आयुक्तांना पालिकेने दिले आहेत. प्राणवायू सुविधा, औषधे, कृत्रिम श्वसनयंत्रणा, मुखपट्ट्या, पीपीई कीट, चाचणी संच इत्यादींचा साठा करून ठेवावा, असे यात सूचित केले आहे.
खासगी रुग्णालयांनी थेट रुग्णांना दाखल करू नये. विभागीय करोना नियंत्रण केंद्राच्या सूचनेनुसारच रुग्णांना दाखल करावे. उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी खाटा उपलब्ध राहाव्यात यासाठी लक्षणेविरहित आणि कोणताही दीर्घकालीन आजार नसलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करू नये. अशा रुग्णांना दाखल केले असल्यास पुढील तीन दिवसांमध्ये घरी सोडून खाटा रिक्त कराव्यात, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.
राज्याच्या नियमावलीनुसारच दर आकारणी
राज्याने आखून दिलेल्या नियमावलीनुसारच करोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी दर आकारणी खासगी रुग्णालयांनी करावी. या रुग्णालयांचे लेखापरीक्षण पालिकेने करावे, असेही यात नमूद केले आहे.
दोन हजार खाटांची गरज
५ मे रोजी मुंबईत खासगी रुग्णालयांतील ८० टक्के म्हणजे ७४१० खाटा पालिकेने ताब्यात घेतल्या होत्या. यात सर्वसाधारण खाटांची संख्या १ हजार १३७, ऑक्सिजन खाटा ४ हजार ६७०, अतिदक्षता खाटा १ हजार ४९९ आणि डायलिसिसच्या चार खाटा होत्या. तसेच बालकांच्या सर्वसाधारण खाटा ७३ आणि अतिदक्षता विभागाच्या १८ तर नवजात बालकांसाठी नऊ अतिदक्षता खाटा होत्या. यातील सध्या ५ हजार ३१९ खाटा कार्यरत असून आणखी दोन हजार ९१ खाटा कार्यरत कराव्या लागणार आहेत.
The post खासगी रुग्णालयांत ८० टक्के खाटा राखीव; परवानगीशिवाय रुग्ण दाखल करण्यास मनाई appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3q0fBms
via
No comments:
Post a Comment