गेल्या वर्षात रूळ ओलांडताना १,११४ जणांचा मृत्यू
मुंबई : निर्बंध शिथिल होताच मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरीय हद्दीत प्रवाशांची गर्दी वाढून पुन्हा एकदा जीवघेणा प्रवास सुरू झाला आहे. २०२१ या वर्षात विविध रेल्वे अपघातांमध्ये जवळपास १३०० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे रुळ ओलांडताना लोकल तसेच एक्स्प्रेस गाड्यांची ठोकर लागणे आणि लोकलमधून पडून होणाऱ्या अपघातांत मोठी वाढ झाली आहे. रेल्वे गाड्यांच्या धडकेत १ हजार ११४ जणांचा मृत्यू झाला असून लोकल, एक्स्प्रेस गाड्यांमधून पडून २७७ जण दगावल्याची माहिती लोहमार्ग पोलीस आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली.
वर्ष २०२० च्या तुलनेत जवळपास तीनशे अपघात वाढले आहेत. मार्च २०२० च्या अखेरीस करोनामुळे टाळेबंदी लागली आणि उपनगरीय रेल्वे बंद झाली. मेल,एक्स्प्रेसमधून श्रमिकांनाच प्रवासाची परवानगी देण्यात आली. जून २०२० पासून लोकल अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी सुरू झाली. त्यानंतर परिस्थितीनुसार लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या प्रवासाच्या नियमांतही बदल झाले. त्यामुळे २०२० मध्ये मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील अपघात काहिसे कमी झाले. २०२०मध्ये रूळ ओलांडताना ७३० जणांचा मृत्यू झाला आणि १२९ जखमी झाले तर लोकल तसेच एक्स्प्रेस गाड्यांतून पडून १७७ जण दगावले तर ३६१ जण जखमी झाले. त्याउलट २०२१ मध्ये अपघातांत मोठी वाढ झाली. गेल्या वर्षी रेल्वे रूळ ओलांडताना लोकल तसेच एक्स्प्रेस गाड्यांची ठोकर लागून तब्बल १ हजार ११४ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये ७४८ मध्य रेल्वे, तर उर्वरित पश्चिम रेल्वे मार्गावरील घटना आहेत तर १७६ जखमींची नोंद आहे. लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांमधून पडून २७७ जणांनी जीव गमावला असून ४४२ जण जखमी आहेत. रेल्वेच्या खांबांना धडकल्यामुळे ६ जणांचा मृत्यू झाला आणि १७ जण जखमी झाले.
आत्महत्येच्या घटनांत वाढ
मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. २०२० मध्ये २७ जणांनी रेल्वे गाड्यांसमोर येऊन आत्महत्या केल्या होत्या. गेल्यावर्षी हीच संख्या ५४ झाली. ४१ आत्महत्या या मध्य रेल्वेच्या हद्दीत असून उर्वरित पश्चिम रेल्वेच्या हद्दीत झाल्या आहेत.
गतवर्षात १७५२ जणांचा मृत्यू
लोहमार्ग पोलीस आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते डिसेंबर २०२१ मध्ये एकूण १ हजार ७५२ मृत्यूंची नोंद मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरीय स्थानक हद्दीत झाली आहे. यामध्ये रेल्वे रुळ ओलांडताना आणि लोकल, एक्स्प्रेस गाड्यांमधून पडून झालेलेच मृत्यू अधिक आहे. अन्य मृत्यू झालेल्या घटनांमध्ये धावत्या लोकलमध्ये रुळाजवळील खाबांना प्रवासी धडकणे, रेल्वे गाडी व फलाटामधील रिकाम्या जागेत पडणे, ओव्हरहेड वायरचा शॉक लागणे, आत्महत्या, नैसर्गिक मृत्यू इत्यादीची नोंद आहे.
The post निर्बंध शिथिल होताच रेल्वे अपघातांत वाढ; गेल्या वर्षात रूळ ओलांडताना १,११४ जणांचा मृत्यू appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/34itq7i
via
No comments:
Post a Comment