गेल्या दीड वर्षातील आतापर्यंतची कारवाई
मुंबई : मुंबईतील करोनाचे रुग्ण वेगाने वाढत असल्यामुळे विनामुखपट्टी फिरणाऱ्या नागरिकांविरोधातील कारवाई तीव्र करण्यात आली आहे. मंगळवारी दिवसभरात नऊ हजारांहून अधिक नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. परंतु पालिकेच्या यंत्रणेमार्फत केल्या जाणाऱ्या कारवाईपेक्षा पोलिसांकडून केली जाणारी कारवाई अधिक वेगवान झाली आहे.
विनामुखपट्टी फिरणाऱ्यांविरोधात पालिकेने दुसऱ्या लाटेदरम्यान कडक मोहीम आखली होती. मुखपट्टी नाही तर प्रवेश नाही असे सांगणारे फलक जागोजागी लावण्यात आले होते. तसेच विनामुखपट्टी फिरणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी क्लीनअप मार्शलची संख्याही वाढवण्यात आली होती. दिवसाला २५ हजार नागरिकांवर कारवाई करण्याचे लक्ष्य देण्यात आले होते. मात्र प्रसाराचा वेग ओसरू लागल्यावर कारवाईही कमी होऊ लागली. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यानंतर रुग्णसंख्या वाढू लागल्यावर विनामुखपट्टी फिरणाऱ्यांविरोधात पुन्हा एकदा कारवाई होऊ लागली आहे. मात्र या वेळी पालिकेच्या यंत्रणेपेक्षा पोलिसांच्या यंत्रणेकडून होत असलेल्या कारवाईला वेग आला आहे.
मंगळवारी एका दिवसात पालिका व पोलिसांनी ९,७६१ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून ८ लाख ७३ हजार चारशे रुपये दंड वसूल केला. त्यापैकी ५,३९४ लोकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. रेल्वेच्या हद्दीतील कारवाई मात्र पूर्णत: बंद असल्याचे आकडेवारीवरून दिसते.
पालिकेने गेल्या दीड वर्षात आतापर्यंत ३४ लाखांहून अधिक नागरिकांविरोधात कारवाई करून ६७ कोटींहून अधिक दंड वसूल केला आहे. पोलिसांच्या यंत्रणेने एकूण ७ लाख ९० हजारांहून अधिक नागरिकांविरोधात कारवाई करून १५ कोटी ७७ लाख १७ हजारांहून अधिक दंड वसूल केला आहे.
The post मुखपट्टीविना फिरणाऱ्या नऊ हजार जणांना दंड; गेल्या दीड वर्षातील आतापर्यंतची कारवाई appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3q1uPrx
via
No comments:
Post a Comment